Lost File Found After Five Years in Miraj Corporation | Sarkarnama

'गुन्हा दाखल' चे आदेश मिळताच फाईल सापडली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

एका प्रकरणात शेजा-यांने केलेल्या बेकायदा बांधकामाबाबत तक्रारीसाठी परवान्याची अधिकृत कागदपत्रे शेजा-यास मिळेनात. त्याचे कारण बांधकाम परवान्याची फाईल पाच वर्षांपासून गायब होती. अखेर आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याची भूमीका घेतल्यावर ही फाईल सापडली

मिरज : महापालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवान्याची फाईल गायब होणे, हरवणे, हे नागरिकांच्या अंगवळणी पडले आहे. कारभारी, नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या टोळीमुळेच हे सुरू आहे. बडे बिल्डर्स, बांधकाम ठेकेदारांना यांत सवलत आहे. साहजिकच बांधकामे विनापरवाना सुरू आहेत. त्याचा फटका घरपट्टी विभागास बसतोय. 

अशाच एका प्रकरणात शेजा-यांने केलेल्या बेकायदा बांधकामाबाबत तक्रारीसाठी परवान्याची अधिकृत कागदपत्रे शेजा-यास मिळेनात. त्याचे कारण बांधकाम परवान्याची फाईल पाच वर्षांपासून गायब होती. फाईल कोणा अधिका-याकडे आहे याची माहिती नगररचनात होती. पण बेकायदा बांधकाम करणा-यास मदत करण्यासाठी तक्रारदारास वारंवार फाईल सापडत नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. तोपर्यंत शेजा-याने बांधकाम पूर्णही केले. तक्रारदाराने कागदपत्रांचा पाठपुरावा सुरुच ठेवला. आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन न सापडणारी परवान्याची गायब फाईल शोधण्यासाठी पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. 

श्री. कापडणीस यांनी एक संधी म्हणुन अधिकारी, कर्मचा-यांकडे विचारणा केली. निर्ढावलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी ठकवण्याचा प्रयत्न केला. पण श्री. कापडणीस यांनी अधिका-यास फाईल हरवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न सुरू होता. श्री. कापडणीस यांनी पुन्हा त्या आधिका-यास गुन्हा दाखल करायचे काय झाले? असा सवाल करुन मीच पोलिसांत गुन्हा दाखल करतो, असे सांगताच आधिकारी ताळ्यावर आला. आणि पाच वर्षे गायब असलेली फाईल सहाय्यक आयुक्तांच्या कक्षातून काढुन दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख