कन्नडमध्ये लोणीकरांच्या जावयाची शिवसेनेविरुध्द बंडखोरी

 कन्नडमध्ये लोणीकरांच्या जावयाची शिवसेनेविरुध्द बंडखोरी

औरंगाबाद : शिवसेना-भाजपची अधिकृत युती झाली असली तरी जिल्ह्यात दोन्ही पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे जावई किशोर पवार यांनी बंडखोरी केली आहे. पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल करत महायुतीला आव्हान दिले आहे. 

कन्नड मतदारसंघात युतीचे उदयसिंग राजपूत, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संतोष कोल्हे आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत तालुक्‍यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी नगराध्यक्ष पत्नी स्वाती कोल्हे यांच्यासह बहुतांश नगरसेवकांना सोबत घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. केवळ प्रवेशच नाही तर पक्षाकडून उमेदवारी देखील मिळवली. 

कोल्हे यांच्या उमेदवारीने कन्नडची लढत रंगत होणार असली तरी उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरांमुळे आणखी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून उमेदवारीसाठी अनेकजण इच्छूक होते. पण पक्षाने उदयसिंग राजपूत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तालुक्‍यातील इतर इच्छूकांची समजूत काढून बंडखोरी टाळण्यात शिवसेनेच्या नेत्यांना बऱ्यापैकी यश आले होते. 

पण भाजपकडून किशोर पवार, डॉ. संजय गव्हाणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत युतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढवल्या आहेत. सुरूवातीला कन्नडची लढत शिवसेना विरुध्द शिवस्वराज्य बहुजन पक्ष अशी अपेक्षित होती. परंतु राष्ट्रवादी आणि वंचितच्या उमेदवारामुळे ही लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्‍यता निर्माण झाली. आता भाजपच्या बंडखोरीने याला वेगळे वळण मिळू शकते. 

शिवसेनेच्या राठोड यांचाही अर्ज 
भाजपच्या पवार, गव्हाणे यांच्यानंतर उदयसिंग राजपूत यांना स्वपक्षातील बंडखोराचा देखील सामना करावा लागणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र (राजू) राठोड यांनीही अपक्ष म्हणून आज अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून राठोड यांच्यासह भाजपचे पवार आणि गव्हाणे देखील अर्ज मागे घेतील असा विश्‍वास शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com