स्व. बाळासाहेब ठाकरे आणि सिंधुदुर्ग, एक अतुट नाते!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सिंधुदुर्गावर विशेष प्रेम होते. त्यांनी अगदी शिवसेना स्थापनेपासून अखेरपर्यंत सिंधुदुर्गावरचे प्रेम कायम ठेवले. 1967 पासून त्यांच्या येथे सभा व्हायला सुरवात झाली. 16 नोव्हेंबर 2005 ला मालवणात त्यांची शेवटची सभा झाली. बाळासाहेबांवर सिंधुदुर्गवासीयांनी भरभरून प्रेम केले आणि बाळासाहेबांनीही दिलदारपणे परतफेड केली. त्यांच्या सिंधुदुर्गाशी असलेल्या या नात्याविषयी...
Late Shri Balasaheb Thakrey
Late Shri Balasaheb Thakrey

बाळासाहेब नावाचं वादळ सगळ्या जगाने अनुभवलं तसं सिंधुदुर्गानेही अनुभवलं. फरक इतकाच, की बाळासाहेब म्हणजे सिंधुदुर्गवासीयांच्या घरातला माणूस. सिंधुदुर्गवासीयांनी बाळासाहेबांवर भरभरून प्रेम केलं आणि त्यांनीही जिल्हावासीयांना याची अगदी दिलदारपणे परतफेड केली. याचा अनुभव अगदी त्यांच्या जिल्ह्यातल्या पहिल्या 1967 च्या सभेपासून मालवणात 16 नोव्हेंबर 2005 ला झालेल्या शेवटच्या जाहीर सभेपर्यंत आला.

शिवसेना, बाळासाहेब आणि कोकण, विशेषतः सिंधुदुर्ग यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. बाळासाहेबांनी कोकणवासीयांशी विशेषतः सिंधुदुर्गवासीयांशी इतके दृढ नाते निर्माण केले, की अनेक घरांत आजही त्यांची प्रतिमा आवर्जून दिसते. हे नाते इतके दृढ होण्यामागेही त्यांचे सागराइतके विशाल काम आणि दिलदार स्वभाव आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करायला सुरवात केली. त्यावेळी त्यांच्या भोवतीचे बरेचसे शिलेदार सिंधुदुर्गातील होते. मुंबईबरोबर कोकणातही शिवसेना स्थापनेसाठी प्रयत्न सुरू झाले. यासाठी स्वतः बाळासाहेब विशेष लक्ष घालायचे. 1967 मध्ये सावंतवाडीत जयप्रकाश चौकातील व्यासपीठावर (सध्याचे इंदिरा गांधी संकुल) त्यांची पहिली सभा झाली. त्याच वेळी जिल्ह्यात त्यांना तीन सभा घ्यायच्या होत्या. 

सावंतवाडी पाठोपाठ मालवणात सभा झाली; पण मुंबईत त्या काळात सीमाप्रश्‍न चिघळला होता. बाळासाहेबांना तातडीने मुंबईत जावे लागले. त्यामुळे कणकवलीची सभा रद्द करावी लागली.यानंतर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने संघटना बांधणी सुरू झाली. दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक आदींच्या मार्गदर्शनाखाली वसंत केसरकर व इतर कार्यकर्त्यांनी संघटना बांधणी सुरू केली. तो काळ भारलेला होता. बाळासाहेबांच्या आदेशासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी वाढत होती. नेते पायपीट करून, सायकलवरून गावोगाव जाऊन पक्ष वाढवत होते. पक्षवाढीपेक्षा सामाजिक काम मोठ्या प्रमाणात उभारले जात होते. लोकाधिकार समितीची स्थानिक कमिटी स्थापन करून येथील तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

त्या काळात सिंधुदुर्ग म्हणजे समाजवादी आणि कॉंग्रेसचा गड होता. शिवसेना उभी करणे सोपे नव्हते. धड व्यासपीठ, सभागृहसुद्धा मिळणे कठीण असायचे. यामुळे कधी कधी तर झाडाखाली, जागा मिळेल तिथे कार्यकर्ते सभा घ्यायचे. शाखा स्थापन करायचे. शिवसेनेचा मुंबईत परप्रांतीय हटाओ हा प्रमुख उद्देश होता. सिंधुदुर्गात तर परप्रांतीय नाहीत. मग येथे शिवसेनेचे काय काम, असा प्रचार त्या काळात केला जायचा; पण बाळासाहेबांच्या विचाराने भारलेले शिवसैनिक खचले नाहीत. आरोग्य शिबिरे झाली. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी आंदोलने उभी राहिली. लोकांशी नाते निर्माण झाले. चाकरमानी आणि बाळासाहेब यांच्या अतुट नात्याचाही सिंधुदुर्गवासीयांवर प्रभाव पडला. यामुळे बाळासाहेब सिंधुदुर्गवासीयांच्या गळ्यातील ताईत कधी बनले हे समजलेच नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवामुक्ती अशा मोठ्या आंदोलनांची शिवसेनेची बरीच सूत्रं सिंधुदुर्गातून हलायची. 

पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेना संघटना बांधणीचे प्रयत्नही सिंधुदुर्गातून झाले. त्या काळात केवळ प्रेम आणि विश्‍वास या दोनच गोष्टींनी सिंधुदुर्गात बाळासाहेबांनी जिवाभावाचे कार्यकर्ते जोडले. यात आर्थिक लाभ, फायदा-तोटा याचा हिशेब नव्हता. येथील अनेकांना ते व्यक्तिशः ओळखत. अगदी घरच्यासारखे चौकशी करायचे. त्यांनी सिंधुदुर्गात बऱ्याच सभा गाजविल्या. सावंतवाडी व मालवणात त्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या. अलीकडे 1990 च्या निवडणुकीत सावंतवाडीतील शिवसेनेचे उमेदवार डॉ. जयवंत नाईक यांच्यासाठी शिवउद्यानात (आताचे जगन्नाथराव भोसले उद्यान) झालेली सभा आजही अनेकांच्या आठवणीत आहे.

युती सरकार सत्तेवर आले त्यात कोकणचा मोठा वाटा होता. कोकणाने जवळपास 90 टक्के आमदारपदे शिवसेनेच्या पदरात घातली. यामुळे बाळासाहेबांशी असलेले नाते आणखी दृढ झाले. बाळासाहेब हे रसायनच वेगळे होते. कोकणने दिलेल्या या भरभरून प्रेमाची परतफेड ते कोरड्या आश्‍वासनाने करणार नव्हते. त्यांनी 1995 मध्ये मालवणच्या बोर्डिंग मैदानावर सभा घेतली. त्यात त्यांनी आपल्या दिलदार शैलीत कोकणवासीयांचे आभार मानले. यानंतर युती सरकारने कोकण, पर्यायाने सिंधुदुर्गावर निधीचा पाऊस पाडला. निधी कसा येतो, विकास म्हणजे काय, हे याच साडेचार वर्षांच्या काळात कोकणवासीयांना कळले. मुख्यमंत्रिपद कोकणच्या मनोहर जोशी आणि त्यानंतर नारायण राणेंना दिले.

पुढे 2005 मध्ये सिंधुदुर्गाच्या शिवसेनेत वादळ आले. भगवामय झालेल्या सिंधुदुर्गाला मोठे खिंडार पडले. उद्धव ठाकरेंवर आरोप करून नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील कार्यकर्तेही कॉंग्रेसमध्ये गेले. सिंधुदुर्गात शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. शिवसेनेने मोठ्या नेत्यांची फौज सिंधुदुर्गात उतरविली; पण त्यांना सभा सोडाच, प्रचारासाठी फिरणेही कठीण बनले. पोटनिवडणूक लागली. शिवसेनेने परशुराम उपरकरांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेला प्रचारासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्तेही मिळत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वतः बाळासाहेबांनी आपण सभा घेणार असल्याचे जाहीर केले. तारीखही ठरली, 16 नोव्हेंबर 2005. 

या सभेला मोठा बंदोबस्त होता. राणेंचा गड असलेल्या मालवणात बाळासाहेब काय बोलणार, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. याहीपेक्षा इतक्‍या प्रतिकूल परिस्थितीत सभेला किती उपस्थिती असणार, बाळासाहेबांच्या लौकिकाला शोभेशी सभा होणार का, असे कितीतरी प्रश्‍न होते. सभेची वेळ सायंकाळी सहाची होती; पण पाच वाजल्यापासूनच गर्दी जमू लागली. यात कार्यकर्त्यांपेक्षा बाळासाहेबांवर प्रेम असलेल्यांची संख्या मोठी होती. साडेसातच्या दरम्यान बाळासाहेब व्यासपीठावर आले. समोरच्या मैदानात उभे राहायलाही जागा नव्हती. पुढचे तीन तास सभा चालली. समोर जनसमुदाय जागेवर खिळलेला होता. कानात प्राण आणून बाळासाहेबांचे विचार ऐकत होता. यात कुठेही गाड्या पाठवून जमा केलेले कार्यकर्ते नव्हते. होते ते फक्त बाळासाहेबांना मानणारे सिंधुदुर्गवासीय. प्रतिकूल स्थितीतही इतका मोठा जनसमुदाय जमा होणारा नेता अभावानेच दिसतो. असा नेता असला तरी तो आपल्या भागावर नितांत प्रेम करणारा असावा लागतो.

असे होते प्रेम
बाळासाहेबांबद्दल शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख वसंत केसरकर यांनी सांगितलेली आठवण बोलकी आहे. श्री. केसरकर म्हणाले, "त्या काळात गावोगाव रस्ते पोचले नव्हते. गाड्या नव्हत्या. आम्ही संघटनेच्या कामासाठी असेच एका गावात सायकलने गेलो होतो. 1981 चा तो काळ होता. आम्ही पोचलो तेव्हा तेथील एका धनगरवाड्यावरच्या आजारी मुलाला ग्रामस्थ चादरीत गुंडाळून उचलून उपचारासाठी पायीच नेत होते. आमच्यासमोरच त्याने प्राण सोडला. त्यानंतर काही दिवसांनी बाळासाहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी लगेच आपल्या नेहमीच्या वापरातील गाडी सिंधुदुर्गासाठी दिली. त्यात आवश्‍यक बदल करून त्याची रुग्णवाहिका बनवून देण्यात आली.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com