Local Congress leaders in Akola gets 'booster dos' | Sarkarnama

अकोल्यातील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना मिळाला `बुस्टर डोस' 

श्रीकांत पाचकवडे 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने विजयी पताका फडकविल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी इच्छुक कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना बुस्टर डोस मिळाला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासोबतच कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्ताधारी भाजपविरुद्ध आता जोमाने कामाला लागण्यासाठी कंबर कसली आहे. 

अकोला : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने विजयी पताका फडकविल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी इच्छुक कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना बुस्टर डोस मिळाला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासोबतच कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्ताधारी भाजपविरुद्ध आता जोमाने कामाला लागण्यासाठी कंबर कसली आहे. 

गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजप विरुद्ध कॉंग्रेसकडून सातत्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. मात्र, राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही लोकसभा, विधानसभांच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षीत यश साध्य करता आले नाही. पक्षातंर्गत वाढलेले गटा-तटाचे राजकारण आणि त्यातूनच सुरू असलेल्या कुरघोड्या या अपयशाला कारणीभूत असू शकतात. मात्र, भाजपविरुद्ध वाढत असलेला जनतेचा रोष कॅश करण्यास काही प्रमाणात कॉंग्रेस यशस्वी झाली असेच म्हणावे लागले. स्थानिक पातळीवरील राजकारण पाहता अकोला जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून खासदार संजय धोत्रे यांनी लोकसभा मतदारसंघ तर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विधानसभेचे आपापले गड ताब्यात ठेवले आहेत. 

भाजपच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा कॉंग्रेसने अनेकदा प्रयत्न केला. मात्र, पक्षातंर्गत गटा-तटाच्या राजकारणाच्या वादामुळे भाजपचा गड अभेद राहिला. आगामी निवडणूक लक्षात घेता कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधिर ढोणे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, महासचिव प्रकाश तायडे, राजेश भारती, अकोला लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे आदी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेली अन्यायकारक करवाढ, शहरातील मुलभूत समस्यांसह रस्ते बांधकामात झालेल्या अनियमितेवर आक्रमक आंदोलने करून जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. हे करीत असताना आगामी लोकसभा आणि विधानसभेची मोर्चेबांधणी कॉंग्रेसचे स्थानिक नेते करीत आहेत. 

भारिप बहुजन महासंघाशी आघाडी न झाल्यास पक्षात डॉ. अभय पाटील यांच्या रुपाने कॉंग्रेसने भाजपला टक्कर देण्यासाठी मराठा समाजाचा सक्षम पर्यायही शोधल्याने पक्षात नवचैतन्य परसले आहे. त्यात भर म्हणून की काय मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्याच्या विधानसभेत कॉंग्रेसने भाजपला सत्तेतून पायउतार करून मिळविलेला विजय कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना बुस्टर डोस देणारा ठरला आहे. या विजयाने कॉंग्रेसमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असले तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस काय करिष्मा दाखवेल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख