Loan Waiver List will be Announced by Month End | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

28 फेब्रुवारीला होणार कर्जमाफीची यादी जाहीर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार सप्टेंबर 2019 पर्यंत दोन लाख रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती

मुंबई : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांची यादी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती, मात्र यासाठी सरकारने मुदतवाढ दिली असून ही यादी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आकस्मिकता निधीत 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला असला तरी त्या निर्णयावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. येत्या एक दोन दिवसांत त्या प्रस्तावावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यास मार्चपासून शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार सप्टेंबर 2019 पर्यंत दोन लाख रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी आकस्मिकता निधीत 15 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे. 

या योजनेचा लाभ सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड बॅंक खात्याशी जोडले असणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी अजूनही आधारकार्ड शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी जोडले गेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड मुदतीत केली आहे, अशांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अधिवेशन काळात नवीन घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख