चिमुकली मुख्यमंत्र्यांना पत्रात म्हणते, `माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांना पत्र लिहिणारी श्रेया सचिन हराळे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांना पत्र लिहिणारी श्रेया सचिन हराळे.

अंबड (जि. जालना) ः एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत. परिवहनमंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं; पण आता कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागली आहे. विशेष म्हणजे एका चिमुरडीने याला वाचा फोडली आहे. 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील या चिमुकलीने आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. तेव्हा तिच्या बाबांनी तिला जे सांगितलं, त्यावरून तिनं बिचारीनं बापाची वेदना जाणली आणि आपल्या परीनं त्यावर उपायही शोधला. या चिमुकलीनं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं. त्यात माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते ओव्हटाईम करणार नाहीत आणि मला शाळेत सोडायला येऊ शकतील, अशी गळच घातली. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

श्रेया सचिन हराळे असं या चिमुरडीचं नाव आहे. अंबडच्या मत्स्योदरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकते. "सकाळ'नं तिच्या वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी यामागची कहाणी सांगितली. तिला घरातल्या कुणीही याबद्दल काही म्हटलं नाही; पण तिनं स्वतःच हे पत्र लिहिलं. त्यात ती म्हणते-
""आदरणीय मुख्यमंत्रीजी,
माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे.
मी मत्स्योदरी स्कूल, अंबड येथे पहिल्या वर्गात शिकते.
पत्रास कारण, की माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात. मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, ""सोनू बेटा ओव्हरटाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे.''
म्हणून आदरणीय मुख्यमंत्रीजी, माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पांचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हरटायम करणार नाही. माझे पप्पा खूप चांगले आहेत.''

कुटुंबप्रमुखावर किती ताण? 
अंबड तालुक्‍यातील ढाकलगावचे रहिवासी असलेले सचिन हराळे 2011 ला एसटीत कंडक्‍टर म्हणून लागले. आठ वर्षांनंतर आता पगार झालाय 17 हजार. राहायला घर नाही, म्हणून त्यांनी हिंमत करून घर बांधण्यासाठी साडेचार लाखांचं कर्ज काढलं होतं. त्याचा महिना 13 हजार रुपये हप्ता भरावा लागतो. पगारातले उरतात फक्त साडेतीन हजार. त्यांना पहिलीतली श्रेया आणि साडेतीन वर्षांची श्रुती या दोन मुली. घरखर्च, किराणा, मुलांचं शिक्षण, गणवेश, कपडे, खाणपिणं यासाठी पैसे उरतात तरी कुठे?

म्हणून करतात ओव्हरटाईम 
घरची परिस्थिती जेमतेम. साडेतीन हजारांत काय काय करणार? म्हणून ते रात्रीबेरात्रीही ओव्हरटाईम करतात आणि गाडीवर जातात. त्यामुळे पगारात थोडीफार तरी वाढ होते. या खर्चातून घर चालवतो. मुलगी रोज विचारते, ""पप्पा रोज उशिरा का येतात?'' तिची समजूत काढताना तिला हे सांगितलं, तर तिनं थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रच लिहिलं, असं सचिन हराळे सांगत होते. 

मुख्यमंत्री काय उत्तर देणार? 
बापाची वेदना जाणत पहिलीतल्या चिमुरडीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं खरं; पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, याचीच प्रतीक्षा हराळे कुटुंबाबरोबरच हे पत्र वाचलेल्या नागरिकांनाही असणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com