liquor-smuggler-kills-police-officer-smashing-him-jeep | Sarkarnama

दारूमाफियाची मस्ती : दारू अडवताच फौजदाराला स्कार्पिओखाली चिरडले

साईनाथ सोनटक्के
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

चंद्रपूर:  दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे एका दारूमाफियाने फौजदार छत्रपती चिडे यांना गाडीखाली चिरडून ठार केल्याची घृणास्पद घटना आज घडली.

चंद्रपूर:  दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे एका दारूमाफियाने फौजदार छत्रपती चिडे यांना गाडीखाली चिरडून ठार केल्याची घृणास्पद घटना आज घडली.

अत्यंत नाट्यमय व क्रूरपणे छत्रपती चिडे यांना चिरडून ठार करण्यात आल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. नागभीड पोलिस ठाण्यात तैनात असलेले छत्रपती चिडे यांना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता एका वाहनातून दारू अवैधपणे नेली जात असल्याची माहिती मिळाली. 

या बातमीनुसार चिडे यांनी पोलिस ताफ्यासह ही गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबविता चिडे यांच्या अंगावर घातली. या वेळी इतर पोलिस हजर होते. त्यांनी गंभीर अवस्थेतील जखमी चिडे यांना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात दाखल केले; परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

 या घटनेनंतर वाहनचालक गाडीसह पळून गेला. ही गाडी गडचिरोली येथील दारूमाफियाची असल्याचे समजते. हा दारूमाफिया दररोज दारूची वाहतूक करीत होता.

गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांत दारूबंदी आहे. काही वर्षांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर दारूची अवैधपणे विक्री होत असल्याचे बोलले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख