आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी दुर्बल घटकांना जगविण्यासाठी वापरू - अॅड. प्रकाश आंबेडकर

आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी आपापल्या भागातील दुर्बल घटकांना जगविण्यासाठी वापरूया, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मांडली आहे.
lets use money collected for ambedkar jayanti to help poor says adv prakash ambedkar
lets use money collected for ambedkar jayanti to help poor says adv prakash ambedkar

पुणे - आपल्यासमोर कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने खूप मोठी आहेत. कोरोना पसरण्याबरोबरच लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो कुटुंबाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा प्रश्न लॉकडाऊननंतरही विक्राळ रूप धारण करेल, अशी शक्यता दिसते. आज ह्याची जबाबदारी शासनाबरोबर आपली पण आहे. त्यामुळे आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी आपापल्या भागातील दुर्बल घटकांना जगविण्यासाठी वापरूया, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केले आहे.

सध्याच्या परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीची भूमिका फेसबुकवर मांडताना त्यांनी म्हटले आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आत्ताच्या आव्हानात्मक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि अत्यंत संयमाने आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपण सर्वांनी साजरी केली. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आंबेडकरी युवकांनी प्रथमच ‘ऑनलाईन भीम जयंती २०२०’ च्या माध्यमातून आपली कल्पकता आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्व दर्शविले. आपण फुले आंबेडकरी समाजाची प्रगल्भता आणि सामाजिक बांधिलकी सर्व देशाला दाखवून दिली.

आपल्यासमोर कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने खूप मोठी आहेत. कोरोना पसरण्याबरोबरच लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो कुटुंबाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा प्रश्न लॉकडाऊननंतरही विक्राळ रूप धारण करेल, अशी शक्यता दिसते. आज ह्याची जबाबदारी शासनाबरोबर आपली पण आहे. मी आधी विनंती केल्याप्रमाणे, आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी आपापल्या भागातील दुर्बल घटकांना जगविण्यासाठी वापरूया, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे, की कोरोनाबरोबरच राजकीय पातळीवरसुद्धा आव्हानात्मक परिस्थिती आहेच. भीमा कोरेगाव येथील आंबेडकरवाद्यांवरील हल्ल्याला मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगूनही त्यासाठी मानव अधिकार कार्यकर्त्यांना दोषी धरून अटक करण्यात आली. त्यासाठी खोटे पुरावे रचले गेले. ह्यातच डॉ आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलाखा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएच्या स्वाधीन झाले.

भाजप सरकार हे सातत्याने एका बाजूला आपल्या अस्मितेच्या प्रतीकांवर हल्ला करून ती मोडीत काढण्याचा आणि दुसर्‍या बाजूला आपल्या उपजीविकेची साधने हिरावून घेत आहे. हा लढा दीर्घकालीन आहे आणि तो ही आपल्याला नंतर लढावाच लागणार आहे. राज्यघटना आणि न्यायालयावर आपला विश्वास आहे आणि तो विश्वास कायम ठेवूनच आताच्या महाकठीण परिस्थितीवर लक्ष केंद्रित करूया.

१४ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. भारतातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा आनंद निर्माण करणारा हा दिवस. त्यामुळे हा दिवस कायम एक आनंदाचा सोहळा म्हणूनच साजरा केला गेला पाहिजे. राजगृहावर काळे फडके फडकावल्याचा मुद्दा सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांतून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेला. त्याला कुणीही वेगळ्या प्रकारे विचारात घेऊ नये किंवा कोणत्याही प्रकारे काळा दिवस असल्याचे मानता कामा नये.

बाबासाहेब म्हणाले तसे आपल्याला "भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही" विरोधी- विशेषतः आताच्या संदर्भात फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात खुप विचारपूर्वक लढत द्यावी लागेल. या शक्तींच्या कायम विरोधात उभ्या राहिलेल्या देशभरातील आंबेडकरी शक्तीला, तरुणांना भावनिक बनवून, भडकविण्याचे प्रयत्न केल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक सुरु आहेत आणि गेल्या काही दिवसात ते अधिक प्रखर झालेले दिसत आहेत. ही आपल्या सर्वांच्या परीक्षेची वेळ आहे. म्हणून कोरोना विरुद्धच्या लढ्यावर संपुर्ण लक्ष देत या ब्राह्मणी-फॅसिस्ट शक्ती आणि भांडवली शक्तींविरुद्धची लढाई संविधानाच्या आणि संसदीय राजकारणाच्या चौकटीत तीव्र करत तुरुंगातील आनंद तेलतुंबडें आणि इतर सर्व मानव अधिकार कार्यकर्त्याना अडकवण्याऱ्या सामाजिक-राजकीय शक्तींना हरवू या.

मात्र फुले-शाहू-आंबेडकरवादी शक्तींनी कधिही भावनेच्या आहारी न जाता, आपला संयम न सोडता घटनेच्या मार्गानेच हाही लढा जिंकायचा आहे. कोणत्याही प्रकारच्या भावनिक आवाहनांना आणि कोणत्याही भावनात्मक प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com