leopard seen near minister prajakta tanpures house | Sarkarnama

राज्यमंत्री तनपुरेंच्या गल्लीत बिबट्याचा पिल्लासह फेरफटका 

विलास कुलकर्णी
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

सकाळी आठ वाजता तनपुरे गल्लीत बिबट्या फिरल्याचा बोभाटा झाला.

राहुरी (नगर) :  "पहाटेची नीरव शांतता. कुत्र्यांचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज. दमदार पावले टाकत चाललेला मादी बिबट्या. पाठोपाठ चाललेले बिबट्याचे पिल्लू." हे दृश्य आज पहाटे चार वाजून सात मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या सीसीटीव्हीत कैद झाले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे निवासस्थान असलेल्या गल्लीत बिबट्याने फेरफटका मारला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुळा नदीपात्राजवळील डुबीच्या मळ्यातून बिबट्याने शहरात प्रवेश केला. तिळेश्वर मंदिराजवळून बिबट्या भरवस्तीत गल्लीबोळांत शिरला. बिबट्याला पाहून गल्लीतील कुत्रे जोरात भुंकू लागले. कुत्र्याच्या आवाजाने बोरकर यांच्या बंगल्याच्या शेजारी राहणाऱ्या मंदाबाई साठे जाग्या झाल्या. त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी घाबरून घराचा दरवाजा बंद केला. 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानासमोर बिबट्याने चाचा तनपुरे यांच्या घराजवळील बोळीतून मठ गल्लीकडे मोर्चा वळविला. तेथे शेखर वाघ यांना बिबट्याचे दर्शन घडले. मठ गल्लीतील सिन्नरकर यांच्या दुकानासमोरुन गणपती घाटाच्या दिशेने बिबट्या गेल्याचे वाघ यांनी पाहिले. पुढे रस्ता मुळा नदीपात्राकडे जातो. भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे साफ दुर्लक्ष करीत,  शहराच्या दिशेने भरकटलेला बिबट्या पुन्हा नदीपात्राकडे गेला.

सकाळी आठ वाजता तनपुरे गल्लीत बिबट्या फिरल्याचा बोभाटा झाला. राजेंद्र बोरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात, मादी बिबट्या व त्यापाठोपाठ बिबट्याचे पिल्लू घरासमोरून जातांना दिसले. बोरकर यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. सोशल मीडियात सीसीटीव्ही फुटेज पाठविले. नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. पहाटे चार ते साडेचार दरम्यान शहरातील गल्ली बोळात बिबट्याने फेरफटका मारल्याने, परिसरात भीती पसरली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख