legislative council member suresh dhas demand package for milk producers | Sarkarnama

मागच्या सरकारप्रमाणे दुध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

काही दुध संस्थांनी ३४ रुपये लिटर असलेला भाव एकदम २० रुपये लिटर केला आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचेही सुरेश धस म्हणाले.

बीड : काही बड्या दुध संघांनी अचानक दुधाचे भाव कमी केले आहेत. चार दिवसांपूर्वी ३४ रुपये लिटर असणारा दुधाचा दर आता २० रुपये लिटर झाला आहे. यामुळे दुध उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. सरकारने या दुध उत्पादकांना मदत द्यावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

सोनाई, नॅचरल डिलाईट या संघांनी २० रुपये लिटर दर केला आहे. तर, पारस या दुध संघाने बंद करणार असल्याचे कळविले आहे. अचानक ३४ रुपयांचा दर २० रुपये लिटर झाल्याने दुध उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अलिकडे या व्यवसायात येऊन चांगले उत्पादन करणाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सुरेश धस म्हणाले. दुग्धविकास मंत्र्यांनी दुधाच्या दराबाबत बैठक घ्यावी. मागच्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले होते. आताच्या सरकारनेही अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. अन्यथा या दुध उत्पादकांचे कंबरडे मोडेल, अशी भीतीही श्री. धस यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख