विधान परिषदेसाठीही रंगणार भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असाच सामना बघायला मिळाला. पक्षीय लढाई असली तरीही शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
विधान परिषदेसाठीही रंगणार भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सामना 

सोलापूर  : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असाच सामना बघायला मिळाला. पक्षीय लढाई असली तरीही शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

पश्‍चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून देखील विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपच्या चंद्रकांतदादा पाटलांनी दोन वेळा आमदारकी मिळविली आहे. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीने केलेले कमबॅक विधानपरिषद निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. 

पुणे पदवीधरचे आमदार चंद्रकांतदादा पाटील व पुणे शिक्षकचे आमदार दत्तात्रेय सावंत यांच्या आमदारकीची मुदत 19 जुलै 2020 ला पूर्ण होत आहे. 

चंद्रकांत पाटील यांना कोथरूड येथून विधानसभेवर संधी मिळाल्याने आता या पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार नवखा असणार आहे. 

राष्ट्रवादीकडून देखील यावेळी सर्वसमावेशक उमेदवाराला संधी मिळण्याची शक्‍यता असल्याने या निवडणूकीत भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार नवखे असण्याची शक्‍यता आहे. 

भाजपची उमेदवारी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक एकाच वेळी होणार असून या दोन्ही मतदार संघासाठी सध्या मतदार नोंदणी सुरू आहे. शिक्षक मतदार संघातून आमदार सावंत पुन्हा मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. 
पदवीधरसाठी भाजप किंवा राष्ट्रवादीची उमेदवारी सोलापूर जिल्ह्याला मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीला बंडखोरी घातक 

पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. पदवीधर निवडणूक मात्र राष्ट्रवादी आजपर्यंत फारशी गांभीर्याने घेताना दिसत नव्हती. त्यामुळेच येथून सलग दोनवेळा भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झालेला आहे. 2014 च्या येथील निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 61 हजार 453 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांना 59 हजार 73 मते मिळाली होती. राष्ट्रवादीशी निगडित असलेल्या अरुण लाड यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यांनी 32 हजार मते मिळविली होती. 

बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागली होती. बंडखोरी टाळून भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीला येथून विजय मिळण्याची शक्‍यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांची ही जागा पुन्हा भाजपकडे कायम राखण्यासाठी भाजपही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार हे निश्‍चित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com