इंदापुरात दोन्ही काॅंग्रेसचे नेते वेट `अॅंड वाॅच`च्या भूमिकेत

इंदापुरात दोन्ही काॅंग्रेसचे नेते वेट `अॅंड वाॅच`च्या भूमिकेत

वालचंदनगर : राज्यातील कॉग्रेस- राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी व भाजप-सेना-रासपच्या युतीच्या भूमिकेवरती इंदापूर तालुक्याचे राजकारण अवलंबून असल्याने दोन्ही कॉग्रेसचे पदाधिकारी वेट अॅन्ड वॉच च्या भूमिकेमध्ये आहेत.

इंदापूर तालुक्यातून कॉग्रेसचे हर्षवर्धन पाटील,राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे विधानसभेची निवडणूक लढविण्यावरती ठाम आहेत.

त्यात पाटील यांनी आपली तयारी जोरदार चालविली असून सध्या त्यांचा गावनिहाय दौरा सुरू आहे. त्यांनी 12 आॅगस्ट रोजी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र आघाडीचे जागावाटप निश्चित होत नसल्याचे पाहून त्यांनी तो मेळावा पुढे ढकलला आहे. भरणे आणि माने हे जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांच्या निमित्ताने तालुक्यात भिंगरीसारखे हिंडत आहेत. दोन्ही काॅंग्रेसच्या आाघाडीत ही जागा कोणाला मिळणार, यावर येथील इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

१९९५ पासून हर्षवर्धन पाटील हे तालुक्याचे आमदार असल्याने दोन्ही कॉग्रेसच्या आघाडीमध्ये इंदापूरचे जागा कॉग्रेसकडे जात होती. मात्र २०१४ ला दोन्ही कॉग्रेस व भाजप-सेना स्वतंत्र लढली.यामध्ये राष्ट्रवादीचे  दत्तात्रेय भरणे आमदार झाल्याने इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे. मात्र विधानसभेच्या उमेदवारीसाठी हर्षवर्धन पाटील यांची आग्रही मागणी असून लोकसभेप्रमाणे विधानसभेला मित्र पक्ष आघाडीचा धर्म पाळेल अशी अपेक्षा आहे. अशा परस्थिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान आमदारांच्या जागा ज्या -त्या पक्षाकडे राहाव्यात हे आघाडीचे सुत्र असले तरीही अपवाद एखाद्या दुसऱ्या जागेबाबत फेरविचार होवू शकत असल्याचे सांगितल्याने आमदार भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील दाेघांनाही आघाडीची इंदापूरची उमेदवारी आपल्या मिळेल अशी अपेक्षा आहे. 

इंदापूरच्या जागेवरती शिवसेना हक्क...तर रासपचीची ही मागणी... 

भाजप -सेनेच्या युतीमध्ये इंदापूरची जागा ही पूर्वीपासून शिवसेनेकडे आहे. मात्र २०१४ मध्ये भाजप-सेना स्वतंत्र लढल्यामुळे दोन्ही पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. सध्या राज्यभर भाजप व सेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. मात्र तालुक्यातील दोन्ही कॉग्रेसच्या आघाडीची जागेचा उमेदवार अद्याप निश्‍चित नसल्यामुळे दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांना भाजप की सेनेमध्ये जावे याच्या विचारामध्ये गुंतलेले आहेत. शिवसेनेनेही इंदापूरच्या जागेची चाचपणी सुरु केली आहे. तसेच इंदापूरच्या जागेची राष्ट्रीय समाज पक्षाने ही मागणी केली आहे. भाजप-सेना युती झाल्यास भाजपमध्ये जाणाऱ्या उमेदवाराला इंदापूर ची जागा शिवसेना किंवा राष्ट्रीय समाजपक्षाकडे  गेल्यास काय करायचे हा प्रश्‍न निर्माण होवू शकत असल्याने दोन्ही कॉग्रेसचे पदाधिकारी वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत.

 दिग्गज भाजपच्या संपर्कामध्ये...
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानगाथा पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केले आहे. आमदार दत्तात्रेय भरणे यांंचीही भाजपशी जवळीक आहे. तसेच सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने व सभापती प्रवीण माने यांचे ही मुख्यमंत्र्याशी सलोख्याचे संबध आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com