Leaders trying to pacify disgruntled Shivsainiks | Sarkarnama

नाराज शिवसैनिकांची नेत्यांकडून मनधरणी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 एप्रिल 2017

सत्ता संघर्षातून शिवसेना-भाजप या दोन पक्षातील युतीला राज्य पातळीवरून तिलांजली देण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद जिल्हा व तालुका पातळीवर देखील उमटायला लागले आहेत. जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने औरंगाबाद व जालन्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी जुळवत सत्ता काबीज केली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरून देखील सत्तेपासून दूर लोटल्या गेलेल्या भाजपने शिवसेनेला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे.

औरंगाबादः पक्षात मान मिळत नसल्याचे कारण देत शिवसेनेतील नाराज भाजपच्या गळाला लागत असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते हवालदिल झाले आहेत. पक्षाला लागलेल्या गळतीचे रुपांतर भगदाडात होण्याआधीच नाराजांची मनधरणी करण्याची मोहिम नेत्यांकडून हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी त्या त्या विभागातील शिवसेना उपशहप्रमुखांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून यापुढे एकही शिवसैनिक किंवा पदाधिकारी भाजपात जाणार नाही याची काळजी शिवसेनेकडून घेतली जात आहे.

सत्ता संघर्षातून शिवसेना-भाजप या दोन पक्षातील युतीला राज्य पातळीवरून तिलांजली देण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद जिल्हा व तालुका पातळीवर देखील उमटायला लागले आहेत. जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने औरंगाबाद व जालन्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी जुळवत सत्ता काबीज केली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरून देखील सत्तेपासून दूर लोटल्या गेलेल्या भाजपने शिवसेनेला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचा एक विभागप्रमुख व अंपगसेनेच्या जिल्हा संघटकाला भाजपात दिलेला प्रवेश हा याचाच एक भाग समजला जातो. शिवसेनेचे दोन पदाधिकारी भाजपावासी झाल्याने शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होणार या चर्चेला हवा देण्यात आली. हे लोण पसरण्याआधीच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसैनिकांची थेट-भेट
पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पक्ष सोडून जात असल्याची दखल शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी घेतली असल्याची चर्चा आहे. शहरातील ज्या भागातील शिवसैनिक, पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत त्यांची समजूत काढून मनधरणी करण्यासाठी हे दोन्ही नेते थेट त्या कार्यकर्त्यांच्या घरी धडक देत आहेत. त्याची कुणाबद्दल आणि काय तक्रार आहे हे जाणून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा प्रामाणिकपणे होत असल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेतून कोणी बोहर पडणार नाही याची काळजी घेतानांच भाजपमधीलच काही बडे मासे गळाला लावण्याच्या जोरदार हालचाली देखील शिवसेनेतून सुरु झाल्या आहेत.

धक्‍क्‍यांचा दोन्हीकडून दावा
शिवसेनेतून एक-दोन पदाधिकारी भाजपमध्ये गेले म्हणजे शिवसेना फुटली असे म्हणणे अतिरंजितपणाचे लक्षण आहे, उलट काही दिवस वाट पाहा आम्हीच भाजपला जोरदार धक्का देऊ असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येत असल्याचेही त्यांनी सांगतिले. एकीकडे शिवसेना धक्का तंत्राचा दावा करत आहे, तर तिकडे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी देखील शिवसेनेला प्रतिआव्हान देत शिवसेनेला आणखी धक्के देण्याची भाषा केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख