माझ्या समाजाला तीन तारांच्या कंपाऊंडमध्ये बंदिस्त केले जाईल!

धर्मांध जातीयवादी केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपल्या अस्तित्त्वाला सुरूंग लावला आहे. लोकसभेने बहुमताच्या बळावर एन.आर.सी., सी.ए.ए. आणि एन.पी.आर. हे कायदे आणले आहेत.
laxman mane
laxman mane

कोल्हापूर : आम्हाला भारतीय राज्यघटनेने जन्मत:च नागरिकत्व दिलेले आहे. आता सरकार म्हणते, तुमच्याकडे त्यासंबंधीचा पुरावा पाहिजे. हा पुरावा 1950 पूर्वीचा पाहिजे. याचा तडाखा सर्वांना बसणार आहे. यासाठी चळवळ उभारणार असल्याची माहिती माजी आमदार लक्ष्मण माने यांनी दिली. 

तत्पूर्वी, भटक्‍या विमुक्त जमाती संघटनेतर्फे शाहू स्मारक भवन येथे मेळावा झाला. मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. माने म्हणाले, "माझ्यासह घर, गाडी आहे, मुलं नोकऱ्या करत आहेत. थोडीशी शेती आहे; परंतु माझा जन्म 1949 चा. तो कोठे झाला, हे आईला सांगता आले नाही. माझ्या जन्मापूर्वी आमचे सारे लोक हागणदाऱ्यांमध्ये राहात होते. जर सरकारला त्यावेळचा पुरावा मी देऊ शकलो नाही; तर मी अ-नागरिक ठरेन. मी अ-नागरिक ठरलो तर माझी सर्व स्वकष्टाने मिळवलेले घर, गाडी, छोटीशी जमीन, पोरांच्या नोकऱ्या हे सारे बेकायदेशीर होईल. सरकार ते ताब्यात घेईल. लिलाव करून ते विकेल. त्यासंबंधी जिल्हादंडाधिकाऱ्याकडे जाऊन 1950 पूर्वी इथे असल्याचा पुरावा द्यावा लागेल. अन्यथा माझे नागरिकत्व संशयित होईल. मला, माझ्या कुटुंबाला आणि पर्यायाने माझ्या समाजाला पुन्हा एकदा तीन तारांच्या कंपाऊंडमध्ये बंदिस्त केले जाईल.

हा कायदा अंमलात आणू नये, म्हणून साऱ्या देशातले गरीब लोक, अल्पसंख्यांक समाजातले लोक, भटक्‍या विमुक्त समाजातले लोक, आदिवासी, भूमीहिन शेतमजूर, कष्टकरी कामगार, पुरावा न देऊ शकलेले सर्वच नागरिक हे या कायद्याने डिटेन्शन कॅम्पमध्ये जातील. त्यांची सर्व संपत्ती शासन लिलाव करून विकेल. भारतीय राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार काढून घेतला जाईल. आपण मतदार राहणार नाही. हे आर.एस.एस मनूवादाला मातीत गाडल्याशिवाय, वर्णव्यवस्थेचा समूळ नायनाट केल्याशिवाय ही कीड मरणार नाही.'' 

ते म्हणाले, "नागरिकत्व सिद्ध करता येत नाही, त्या सर्वांची चळवळ आपल्याला उभी करायची आहे. हा लढा मोदी सरकारला गाडल्याशिवाय थांबवायचा नाही. 12 मार्च ते 12 एप्रिलपर्यंत ही शोधयात्रा चालेल. या यात्रेचा समारोप बारामती येथे होणाऱ्या अधिवेशनात होईल. अधिवेशनास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले आहे.'' 

जगन्नाथ जाधव, सज्जनसिंग चितोडिया, समशेरसिंह कलाणी, विलास तमांचकर, सुखदेव भोसले, रामचंद्र कांबळे, दादासाहेब जगताप, अजित मेनेकर, सुशिलकुमार कोल्हटकर, अस्लम मुल्ला आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com