लक्ष्मण जगतापांना घटते मताधिक्य विचार करायला लावणारे

लक्ष्मण जगतापांना घटते मताधिक्य विचार करायला लावणारे

राहुल कलाटेंनी अपक्ष उमेदवार म्हणून लढत जोरात दिली.

पिंपरीः वैयक्तिक सबंध, कार्यकर्त्यांचे जाळे आणि पक्षाचे पाठबळ यामुळे राज्यात दोन नंबरचा मोठा असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा नुसता विजयच झाला नाही,तर आमदारकीची हॅटट्रिकही झाली.आपला उमेदवार न देता शिवसेना बंडखोराला पाठिंबा देण्याची अजितदादांची खेळी चिंचवडला यशस्वी झाली नाही.

सुरवातीच्या सात फेऱ्यात,तर भाऊ पिछाडीवर होते. नंतर त्यांनी ती भरून काढत आघाडी वाढवित नेत विजय मिळवला. शहरात आमदारकीची हॅटट्रिक करणारे ते एकमेव आहेत. नगरसेवकापासून पालिकेत विविध पदे, एकदा विधानपरिषद, दोनदा विधानसभा सदस्य झाल्याने निर्माण झालेले सबंध भाऊंच्या कामी आले.

भाजपचे शहराध्यक्षपद त्याशिवाय शहरात (मतदारसंघात)त्यांचे असलेले सर्वाधिक समर्थक नगरसेवक यांची फौजही त्यांना उपयुक्त ठरली.त्यामुळे सर्वपक्षांचे समर्थन असलेला प्रतिस्पर्धी असूनही त्यांनी ३८,४९८ मतांनी विजय संपादन केला.मात्र,तो त्यांना,भाजप व शिवसेनेला सुद्धा निश्चित सुखावणारा नाही. कारण पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊंनी शिवसेनेचे श्रीरंगअप्पा बारणे यांना आपल्या मतदारसंघातून ९७ हजारांची घशघशीत आघाडी दिली होती. त्यामुळे विधानसभेला त्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा त्यांना विश्वास वाटत होता. तो,तर सार्थ ठरला नाहीच. उलट गत विधानसभेला मिळालेल्या मताधिक्यात २२ हजाराने घट झाली.ही बाब त्यांना नक्की विचार करायला लावणारी अशी आहे.

२०१४ ला त्यांनी कलाटेंचाच ६०,२९७ मतांनी पराभव केला होता. बारणेंच्या मावळमध्ये विधानसभेला पिंपरीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. तर,चिंचवड या दुसऱ्या मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचे मताधिक्य घटले. या बाबी बारणेंनाही विचार करायला लावणाऱ्या आहेत. मोदी लाट विधानसभेला अपेक्षित चालली नसल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. भाऊंचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर राहूल कलाटे यांना अपक्ष म्हणून आपले चिन्ह पोचविण्यासाठी कमी वेळ मिळाला. अन्यथा ही लढत चुरशीची झाली असती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com