laxman dhobale towards bjp | Sarkarnama

ढोबळेंचा शब्दफुलोरा ! सर कमळाच्या प्रेमात ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 जुलै 2017

ढोबळे सर शब्दसम्राट! छान छान शब्दांचे भांडारच त्यांच्याकडे आहे. सोबतीला अमोघ वक्‍तृत्व असल्याने ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या भाषणांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने प्रचारासाठी मोठा वापर केला. काळ बदलला आहे. ढोबळे सर दुर्लक्षित झाले आहेत. मात्र त्यांनी आता पुर्वीची भूमिका बदलत भाजपवर शब्दसुमने उधळायला सुरवात केली आहे. आषाढी वारीदिवशी त्यांनी भाजप सरकारचे कसे कौतुक केले, हे त्यांच्या व्हिडीओ पाहूनच व्यवस्थित समजू शकेल. 

सोलापूर : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बहुजन राजकारणाचा चेहरा बनलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सद्या भारतीय जनता पक्षाच्या भलतेच प्रेमात पडलेले दिसत आहेत. आजवरच्या राजकीय वाटचालीत जातीय, धर्मांध म्हणून संभावना केलेल्या भाजपवर शब्दफुलोरा उधळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नुकतेच त्यांनी भाजप सरकारच्या निर्णयांचे "ढोबळे स्टाईल' समर्थन केले आहे, ते पाहता खुद्द भाजपवालेही स्वत:चे असे कौतुक करु शकणार नाहीत! 

ढोबळे सर फर्डे वक्‍ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते राज्यातील मातंग समाजाचे नेतृत्व करतात. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघातून ते 2004 पर्यंत आमदार होत होते. शरद पवार यांनी वेळोवेळी त्यांना मंत्रीपदाची संधीही दिली. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मंगळवेढा मतदारसंघ खुला झाला. ढोबळे सरांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागला. पुनर्रचनेत आरक्षित झालेल्या शेजारच्या मोहोळ मतदारसंघात पवारांनी ढोंबळेंची सोय लावली. ते निवडून आले, मंत्री झाले. काहीकाळ सोलापूरचे पालकमंत्रीही ते होते. 

मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, तसेच राज्यपातळीवरील नेत्यांशी ढोबळेंचे बिनसले. त्यातच 2014 च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याच शिक्षण संस्थेतील महिलेने ढोबळंनी अत्याचार केल्याची फिर्याद दिली. हे निमित्त साधून ढोबळेंचे तिकीट राष्ट्रवादीने कापले आणि रमेश कदम यांना तिकीट दिले. त्यावेळी कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष होते, तसेच ते पक्षनेतृत्वाचे लाडके होते. कदम आमदार झाले आणि काही दिवसांत महामंडळाच्या घोटाळाप्रकरणी आत गेले अजून ते बाहेर आलेले नाहीत. 

दुसऱ्या बाजूला ढोबळेंचा उतरता काळ सुरु झाला. त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली. मात्र त्यांना अनामत रक्कमही राखता आली नाही. पुढील काळात राष्ट्रवादीनेही त्यांना जवळ केले नाही. ते विजनवासात आहेत. भाजपमध्येच त्यांना भविष्य दिसते आहे. मोहोळ विधानसभा अथवा आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभेला आपला विचार होईल, अशी त्यांना आशा आहे. सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल असलेली नाराजी, मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची सुरु असलेली तुरुंगवारी आणि भाजपचे मोहोळमधील उमेदवार संजय क्षीरसागर यांची निष्क्रीयता या सर्व परिस्थितीत ढोबळे मोका शोधत आहेत. मात्र यासाठी त्यांच्यावरील गुन्ह्याचा पॉझिटिव्ह निकाल त्यांना लावावा लागणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख