खासदार सुनील गायकवाडांचे वजन पक्षश्रेंष्ठींवर पडणार की गायकवाडांनाच बदलणार?

लातूर मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला. त्याच्यावर भाजपचे वर्चस्व आहे. मतदारसंघात दोन्हीही पक्षांचे उमेदवार अद्याप निश्‍चित नाहीत. उमेदवारी निवडीपासून ते त्यांच्या विजयापर्यंत भाजपचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
खासदार सुनील गायकवाडांचे वजन पक्षश्रेंष्ठींवर पडणार की गायकवाडांनाच बदलणार?

लातूर : कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी सलग सात वेळा राखला. भाजप दोनदा विजयी झाले. भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी चाकूरकरांचा 2004 मध्ये पराभव केला. 2009 च्या निवडणुकीत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरचे जयवंत आवळे यांना येथून निवडून आणले. 2014 मध्ये "मोदी लाटे'वर भाजपचे डॉ. सुनील गायकवाड स्वार होत अडीच लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. गायकवाडांचा विजय कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला आहे.

जिल्ह्यात काही वर्षांत संभाजी निलंगेकर यांचे नेतृत्व पुढे आले. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांनी कॉंग्रेसचा "हात' कापत "कमळ' फुलविले. लातूरकरांची मागणी नसताना त्यांनी दिलेला रेल्वे बोगी कारखाना आणि जिल्हाभरात पसरणारे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे या मुद्द्यांवरून भाजप रिंगणात उतरेल. तथापि तीन-चार वर्षांत गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातीलच काही गट नाराज आहेत. त्यांना विरोध म्हणून काही गटांतून उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव आणि जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांची नावे पुढे केली जात आहेत. तथापि, गेल्या निवडणुकीसारखेच गायकवाड पक्षश्रेष्ठींकडे वजन वापरून उमेदवारी आणतील, असे समर्थकांना वाटते.

दुसरीकडे कॉंग्रेसला सक्षम उमेदवार सापडत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था हातून गेल्यामुळे आमदार अमित देशमुख सावध पावले उचलत आहेत. कॉंग्रेसतर्फे माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे, डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, उदगीरच्या माजी नगराध्यक्षा उषा कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. 
उमेदवार निवडीत पालकमंत्री निलंगेकर आणि अमित देशमुख यांचा कस लागेल. दरम्यान, ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांना रिंगणात आणले आहे. 

चित्र मतदारसंघाचे 
- भाजपकडून उजनीचे पाणी लातूरला देण्याचे आश्‍वासन अपूर्ण 
- लातूरकरांच्या अस्मितेची लातूर-मुंबई रेल्वे बिदरला 
- बेरोजगारी व शेतकऱ्यांचे प्रश्‍न अनुत्तरीत 
- कृष्णा खोऱ्यातून 21 टीएमसी पाणी मिळवण्यात अपयश 
- राष्ट्रीय महामार्गांची उभारणी आणि कामे धीम्या गतीने 
- लातूर रोड ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा प्रश्न 
----- 
2014 चे मतविभाजन 
डॉ. सुनील गायकवाड (भाजप) : 6,16,650 (विजयी) 
दत्तात्रय बनसोडे (कॉंग्रेस) : 3,63,114 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com