Latur ZP CEO celebrates Ganesh festival with social cause | Sarkarnama

`सीईओं`च्या निवासस्थानी अवतरले डॉक्टर गणपती

विकास गाढवे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

`दात असेपर्यंत हसा`, `कर्म करो - कांड नही`, `ईगो काम बिघडे सिर्फ सहा सेकंदमे` आदी सल्ले तसेच सुविचारांचे फलकही लक्ष वेधून घेत आहेत.

लातूर  :   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर व त्यांच्या पत्नी डॉ. शालिनी या डॉकटर दाम्पत्याने `सामाजिक डॉक्टर ' गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे . गनगन मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचा देखावा उभारून सामाजिक तसेच वैयक्तिक समस्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 पंचायतराज समितीच्या दौऱ्यातून लगेच सावरत डॉ. ईनटकर यांनी केलेला हा देखावा पाहण्यास  अधिकारी व कर्मचारी येत आहेत . 

डॉ. विपिन व डॉ. शालिनी यांनी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. डॉ. विपिन हे सन 2014 च्या युपीएससी परीक्षेतून आयएएस झाले. तर डॉ. शालीनी सध्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. आयएएस झाल्यानंतर सुरूवातीला त्यांनी गडचिरोली काम केले. 

तेथेही त्यांनी गणेशोत्सवात आदिवासीच्या रूपातील गणेशमुर्तीची स्थापना केली होती. लातुरात त्यांचा पहिलाच गणेशोत्सव आहे. या उत्सवात त्यांनी `सामाजिक डॉक्टर` हे मध्यवर्ती सुत्र (थीम) घेऊन निवासस्थानी गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. उंदराला तपासतानाचा डॉक्टरच्या रूपातील गणपतीची मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही मुर्ती डॉ. शालिनी यांनी औरंगाबाद येथून मागवली आहे. 

अडीच वर्षाचा त्यांचा मुलगा आयान बोबड्या भाषेत गणपतीचा उच्चार `गनगन` करतो.  डॉ. शालिनी यांनी म्हणून  गनगन मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचा देखावा उभारला आहे. या देखाव्यातून त्यांनी विविध समस्यांच्या निवारणाचे विनोदी छटा असलेले हलकेफुलके सल्ले दिले आहेत. 

यात  `दात असेपर्यंत हसा`, `कर्म करो - कांड नही`, `ईगो काम बिघडे सिर्फ सहा सेकंदमे` आदी सल्ले तसेच सुविचारांचे फलकही लक्ष वेधून घेत आहेत. गुरूवारी (ता. 13) सकाळपासून जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन या आगळ्यावेगळ्या गणेशोत्सवाचा आनंद घेतला.    

देखाव्यात गनगन हॉस्पीटलमध्ये विविध समस्या सोडवण्याऱ्या डॉक्टरांची नावे दिली आहेत. त्यावर आरोग्यासाठी डॉ. गणपती, समृद्धी संपत्तासाठी डॉ. ऋद्धी, जाहिरात यशासाठी डॉ. सिद्धी, जिल्हा परिषदेची समस्येसाठी डॉ. विपिन, खोड्या शिकण्यासाठी डॉ. आयान यांची नावे आहेत. वैवाहिक समस्येची सेवा बंद असून ती स्वतःच सोडवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देखाव्यातील सजावटचेही वेगळेपण दिसून येत आहेत.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख