शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख काँग्रेसच्या गळाला; अमित देशमुखांची खेळी झाली यशस्वी

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत काँग्रेसचा `हात` जवळ केला आहे. काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांच्या गळाला ते लागले आहेत. देशमुख यांची खेळी यशस्वी झाली आहे. देशमुख यांच्या उपस्थितीत साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख काँग्रेसच्या गळाला; अमित देशमुखांची खेळी झाली यशस्वी

लातूर : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत काँग्रेसचा `हात` जवळ केला आहे. काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांच्या गळाला ते लागले आहेत.  देशमुख यांची खेळी यशस्वी झाली आहे. देशमुख यांच्या उपस्थितीत साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. पण त्यांचा अधिकृत प्रवेश हा ता. दोन एप्रिल रोजी निलंगा येथे नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्यात होणार आहे.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके हे गेल्या २५ वर्षापासून जिल्ह्यातील राजकारणात आहेत. सुरवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी अनेक वर्षे जिल्हा प्रमुख म्हणून काम केले. गेल्या साडे चार वर्षापासून ते शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख काम पाहत आहेत. पण त्यांचे कार्यक्षेत्र हे निलंगा विधानसभा मतदारसंघात जास्त राहिले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले आहे. निलंगा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कमी करण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी खेळी खेळत श्री. साळुंके यांना काँग्रेसमध्ये आणले आहे.

"साळुंके हे संघर्ष करणारा नेता आहे. त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल. त्यांच्या प्रवेशामुळे निलंगा मतदार संघात काँग्रेस बळकट होईल," असा विश्वास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आतापर्यंत निलंगा विधानसभा मतदार संघातून लोकसभेला मताची तूट येत होती. ती साळुंके यांच्या रुपाने भरून निघेल असेही देशमुख म्हणाले. साळुंके हे बिनशर्त काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे पुढचे निकाल काय लागतील हे सांगण्याची गरज नाही. आमच्याकडेही आता इनकमिंग सुरु झाले आहे, असे अशोक पाटील निलंगेकर म्हणाले.

दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांची प्रेरणा घेवूनच आपण आतापर्यंत काम करीत आलो आहे. विरोधी पक्षात असताना सुद्धा देशमुख यांनी आम्ही मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. शिवराज पाटील चाकूरकर, दिलीप देशमुख, अमित देशमुख यांच्या प्रती निष्ठा ठेवूनच आपण पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठेला गालबोट लागेल असे काहीही काम करणार नाही, असे साळुंके यांनी स्पष्ट केले. साळुंके यांचा स्वभाव खळखट्याक करणारा राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संस्कृतीत ते कशी वाटचाल करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com