निवडणुक संपताच कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बेद्रे यांची वकिली सुरू

निवडणुक संपताच कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बेद्रे यांची वकिली सुरू

लातूर : राजकारण हा व्यवसाय आहे, असा समज राजकारणात काम करत असलेल्या सर्वांचाच झाला आहे. राजकारण हा व्यवसाय नसून ती समाजसेवा आहे, हे कार्यकर्ते विसरून जात असून स्वतःच्या व्यवसाय व प्रगतीकडे दुर्लक्ष करत आहेत. राजकारणातील या वास्तवाकडे दुर्लक्ष करत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेद्रे यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच शुक्रवारपासून (ता. 19) आपल्या वकिलीच्या व्यवसायाला सुरवात केली आहे. 

जिल्हा वकील मंडळाच्या कार्यालयाबाहेर उभारून तसे छायाचित्र त्यांनी फेसबुकवर शेअर करत " राजकारण हा व्यवसाय नसून समाजकार्य आहे ', असा संदेशही त्यांनी दिला आहे. ऍड. बेद्रे हे आपण जन्मतः कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे सांगतात. त्यांनी पहिल्यांदा 1977 मध्ये कॉंग्रेससाठी एका बुथवर पोलिंग एजंट (मतदान प्रतिनिधी) काम केले. 1984 पासून त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. दहा वर्ष त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. 

1995 च्या निवडणुकीत निवडणुक कायद्यातील तज्ज्ञ म्हणून त्यांची कॉंग्रेसमध्ये प्रतिमा निर्माण झाली. त्यानंतर त्यांना 1997 मध्ये जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीसपद त्यांना देण्यात आले. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. यातूनच त्यांची 2006 मध्ये नगराध्यक्षपदी निवड झाली. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. तरीही पक्षातील कामांमुळे त्यांची 2010 मध्ये जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. आजतागायत ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. राजकीय जीवनात अनेक चढउतार आले तरी त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. दिवाणी प्रकरणासह सहकार, ट्रस्ट व निवडणुक कायद्याच्या प्रकरणातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. कॉंग्रेस पक्षासाठी वेळ देत "व्ही' मित्रमंडळाच्या माध्यमातूनही त्यांचे समाजकार्य सुरू असते. राजकारण आणि व्यवसाय यात गफलत न करता लोकसभा निवडणुकाचा धुरळा शांत होताच शुक्रवारी त्यांनी आपल्या वकिली व्यवसाय सुरू केला. यातून त्यांनी राजकारणाला व्यवसाय न समाजता व्यवसाय करून राजकारण करावे, असा संदेश राजकीय कार्यकर्त्यांना दिला आहे. 

लीडर आणि प्लीडर ... 
मी तसा प्लीडर (वकील) आहे. मात्र, लोकनेते विलासराव देशमुख यांच्यामुळे मी "लिडर" झालो. प्लीडर आणि लिडरमध्ये "पी" आणि "एल' ही दोनच अक्षरे वेगळी आहेत. यातील "पी' व "एल ' कधी शांत ठेवायचे, हे मला चांगले कळते. यामुळेच "पी' शांत असतो तेव्हा मी लिडर तर "एल' शांत असतो तेव्हा मी प्लीडर असतो. 
अशी मार्मिक प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या लातूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष व्यंकट बेद्रेयांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com