लातूरकरांच्या समस्येला रेल्वेकडून बगलच !

लातूरकरांच्या समस्येला रेल्वेकडून बगलच !

औरंगाबाद : वर्षामागून वर्ष सरतात तरी रेल्वेचे प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यात जर विषय मराठवाडा किंवा महाराष्ट्राचा असेल तर रेल्वेत उच्च पदावर बसलेल्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र व मराठवाडा द्वेष उफाळून येतो.

सुदैवाने सध्या रेल्वेमंत्री पदी महाराष्ट्रातील व्यक्ती बसलेली आहे. पण तरी बाबू लोकांमुळे रेल्वे विकासाच्या बाबतीत मराठवाड्यात दुष्काळच दिसतो. नगर-बीड-परळी या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे उदाहरण यासाठी पुरेसे म्हणावे लागेल. 16 वर्षात या मार्गाचे केवळ 16 किलोमीटर एवढेच काम झाले आहे. म्हणजेच वर्षाला अवघे 1 किलोमीटर. या वेगाने मराठवाड्यातील रेल्वेचा विकास होणार असेल तर त्यासाठी लढणाऱ्यांच्या दुसऱ्या पिढीलाच याचा लाभ मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. 

लातूर-मुंबई एक्‍स्प्रेस रेल्वे बिदरपर्यंत वाढविल्याने पुन्हा एकदा रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या कोत्या मनोवृत्तीचा आणि आपल्या लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. लातूरसाठी तीन नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आणि आश्‍चर्याचा धक्का बसला. 

लातूर-उदगीर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून रेल्वेच्या विस्तारामुळे प्रतिक्रिया उमटायला लागल्या आणि हा प्रश्‍न देशपातळीवर पोचला. हक्काची गाडी पळवल्याची भावना झाल्यामुळे लातूरकरांनी हा प्रश्‍न अस्मितेचा केला, तर तिकडे उदगीरचा विकास लातूरला सहन होत नाही का म्हणत त्यांनी लातूरकरांच्या विरोधात आंदोलन सुरू केले.

एकाच जिल्ह्यातील दोन शहरांमध्ये भांडण लावून बिदरचे खासदार मात्र हा सगळा प्रकार पाहत होते. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने खासदार डॉ. सुनील गायकवाड कात्रीत सापडले. मतदारसंघातील दोन शहरातील मतदार व नागरिकांचा राग शांत कसा करावा हीच चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे कुण्या एका शहराची बाजू घेऊन बिदरच्या खासदारांनी पळवलेली गाडी परत मिळवण्याचा प्रश्‍न तर बाजूलाच राहिला उलट ते अज्ञातवासात गेल्यासारखे गायब झाले. 

नगरपालिका, जिल्हा परिषद व नुकत्याच झालेल्या महापालिकेत झिरो टू हिरो ठरलेले पालकमंत्री व राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मग आपले कौशल्य पणाला लावले. सुरेश प्रभूंची दिल्लीत भेट घेतली आणि लातूरसाठी तीन गाड्यांची सुविधा मिळवल्याची घोषणा करून मोकळे झाले.

मुळात निलंगेकरांनी सुरेश प्रभूंपुढे लातूर रेल्वेचा कुठला प्रश्‍न मांडला, काय मागण्या केल्या, त्यानुसार निर्णय झाले का? तर त्याचे उत्तर नाही. शिवाय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये घोषणा झालेल्या अनेक गाड्या वर्षानुवर्षे सुरू होत नाही मग लातूरकरांसाठी म्हणून सुरू केलेल्या या रेल्वे प्रत्यक्षात रुळावरून कधी धावणार हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

नाव लातूरचे काम मात्र झाले बिदरचेच 
संभाजी पाटील निलंगेकरांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आणि तीन गाड्यांची घोषणा झाली असे मानावे तर हा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण रेल्वेमंत्रालयाचा कारभार पाहता या नव्या गाड्यांच्या घोषणांचा प्रवास हा अनेक वर्षाचा असावा.

त्यातही कर्नाटक राज्याला लाभ मिळावा यासाठी बिदरच्या खासदारांनी पाठपुरावा करून या नव्या गाड्या पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. निलंगेकरांच्या मागणीचा विचार रेल्वेमंत्र्यांनी केला असता तर लातूर-मुंबई एक्‍स्प्रेसचा विस्तार रद्द करून स्वतंत्र गाडी सुुरू झाली असती. उलट सुरेश प्रभूंनी त्या मुद्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे आंदोलन लातूर-उदगीर उस्मानाबादेत आणि नव्या रेल्वे गाड्यांचा लाभ मात्र कर्नाटकला असा हा सगळा लातूरकरांच्या मागणीला बगल देण्याचाच प्रकार म्हणावा लागेल.

मुंबई रेल्वे बिदरपर्यंत वाढवण्याच्या बदल्यात यशवंतपूर-बिदर रेल्वे लातूरकरांच्या माथी मारण्यात आली आहे. यासाठी बंगलोर सारख्या शहरात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो तरूणांना या गाडीचा लाभ होणार असल्याचे कारण सांगितले जाते.

जे कारण कधीही पटण्या सारखे नाही. मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस रेल्वे बिदरपर्यंत वाढवण्याचा निर्णय होऊन आठवडा झाला. परिणामी लातूरकरांना या गाडीत पाय ठेवायला देखील जागा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. लातूर-गुलबर्गा ही नवी रेल्वे डिसेंबरमध्ये सुरू करणार असे सांगितले जाते.

मुळात या रेल्वेचा लातूरकरांना काय उपयोग असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 
एकंदरीत लातूरसाठी तीन नव्या रेल्वे सुरु होणार असल्याचे सांगितले जात असले तरी त्या लातूरकरांसाठी नाही तर कर्नाटकसाठीच आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच अर्थ नाही.

महाराष्ट्राचे आणि मराठी असलेले सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असतांना जे कर्नाटकातील एका खासदाराला जमले ते लातूरच्या खासदार किंवा मंत्र्यांना जमू शकले नाही हेच यावरून स्पष्ट होते. 
कॉंग्रेसची अस्मिता जागी झाली 
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर आमदार अमित देशमुख व त्यांच्या कॉंग्रेस पक्षाची अस्मिता या निमित्ताने अचानक जागी झाली आहे.

रेल्वे प्रश्‍न अस्मितेचा करू नका असा सल्ला बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी दिल्यानंतर या अस्मितेचे धगधगत्या अंगारात रूपांतर झाल्याचे आजच्या रेलरोको आंदोलनात पहायला मिळाले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह लातूर रेल्वे बचाव संघर्ष समितीने रेलरोको करत लातूर-मुंबई एक्‍स्प्रेसचा बिदरपर्यंतचा विस्तार रद्द करण्याची मागणी लावून धरली. आमदार अमित देशमुखही या आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. सतत हवेत असणारे अमित देशमुख या निमित्ताने जमिनीवर आल्याची चर्चा देखील या निमित्ताने रंगली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com