Latur MLA Dheeraj Deshmukh Gave Confidence to Citizens | Sarkarnama

धीरज देशमुख यांनी लातूरकरांना दिला धीर... म्हणाले 'घरातच सुरक्षित रहा

सुशांत सांगवे
रविवार, 5 एप्रिल 2020

लातुरात आढळून आलेले कोरोनाबाधीत आठ रुग्ण हे प्रवासी आहेत. लातूरकर नाहीत. त्यामुळे लातूरमध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण एकही नाही, हा जो दावा आपण लातूरकर करत आहोत, तो अजूनही कायम आहे, अशा शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी लातूरकरांना धीर दिला आहे

लातूर : लातुरात आढळून आलेले कोरोनाबाधीत आठ रुग्ण हे प्रवासी आहेत. लातूरकर नाहीत. त्यामुळे 'लातूरमध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण एकही नाही', हा जो दावा आपण लातूरकर करत आहोत, तो अजूनही कायम आहे, अशा शब्दांत आमदार धीरज देशमुख यांनी लातूरकरांना धीर दिला आहे. घरातच रहा सुरक्षित रहा, अशी विनंती मी लातूरकरांना करतो, असेही ते म्हणाले.

लातुरात आठ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने सध्या भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, देशमुख म्हणाले, कोरोनाबाधीत जे आठ रूग्ण विलासराव देशमुख वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत, ते प्रवासी रूग्ण असून त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे हे माणूसकीच्या दृष्टीने गरजेचे होते. म्हणूनच प्रशासनाच्या वतीने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आजपर्यंत लातूरमध्ये कोरानाग्रस्त एकही रूग्ण नाही, हा दावा अजूनही कायम असल्यामुळे सर्वांनी चिंतीत न होता त्याच जिद्दीने यापुढे देखील आपण आपल्या निश्चियावर ठाम राहू.

संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

दरम्यान, निलंगा येथे आढळून आलेले कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निलंग्यात कोणाकोणाच्या संपर्कात आले, त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूरपर्यंतच्या प्रवासात ते कुठे  आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

ते म्हणाले,  ''हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपुर झिरका येथे गेल्या तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरू २ एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एका धार्मिक स्थळी आढळून आले. या बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे,''

 कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख