Latur : Dowary returned to Father in law by Son in law | Sarkarnama

लग्नात घेतलेला हुंडा 23 वर्षांनी जावयाकडून सासरेबुवांना परत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मे 2017

आहेरा ऐवजी दानपेटी

लग्नात वधू-वराला आहेर करण्याची पुर्वापार चालत आलेल्या पंरपरेला देखील या विवाह सोहळ्यात छेद देण्यात आला. आहेर स्वीकारण्या ऐवजी लग्न मंडपात एक दानपेटी ठेवण्यात आली होती. या दानपेटीत जमा होणारी रक्कम लातूर जिल्ह्यातील हासेगांवच्या एचआयव्ही बाधित मुलाच्या उपचारासाठी देण्यात
येणार आहे.

लातूर  :  हुंडा विरोधी अभियान व जागृतीचे चांगले परिणाम समाजात दिसायला लागले आहेत. 23 वर्षापुर्वी लग्नात घेतलेल्या हुंड्याची रक्कम जावयाने सासरेबुवांना परत केल्याची  आश्‍चर्यकारक घटना नुकतीच अहमदपूर येथे घडली.

मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या प्रा. गोविंद शेळके यांनी हा निर्णय घेत सर्वांना सुखद धक्का दिला.

मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंद शेळके यांचे भाचे कैलास व गीताश्री यांचा शुभविवाह मंगळवारी अहमदपूरात साध्या पध्दतीने पार पडला. प्रा. शेळके यांचे राजकीय क्षेत्रात काम असल्याने या विवाह सोहळ्याला आमदार विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांच्यासह विविध
पक्षांचे नेते उपस्थित होते.

शिवधर्म पध्दतीने झालेल्या या विवाहात वधू-वराकडील मंडळीने अनावश्‍यक खर्चाला फाटा देत समाजापुढे आदर्श निर्माण
केला.

51 हजारांचा धनादेश सुर्पूद

राजकीय क्षेत्रात काम करत असतांना हुंड्यामुळे महिलांचा होणारा छळ, जाणारे बळी आणि मोडणारी लग्न अशा घटना वारंवार समोर यायच्या. समाजातील ही अनिष्ठ प्रथा मोडीत निघावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतांना आपण तरी
मागे का राहावे असा विचार मनात आला.

23 वर्षापुर्वीची परिस्थीती आणि त्यावेळी घेतलेला हुंडा याची रुखरुख होती. त्यावर सासरे बाबुराव पवार यांना हुड्यांची रक्कम परत करण्यायाचा निर्णय घेतला. सासरेबुवांना हाक
मारली, मान्यवर उपस्थित होतेच. त्यांच्या हस्तेच घेतलेल्या हुंड्या पोटी 51 हजारांचा धनादेश सासऱ्यांकडे सुर्पूद केला. या प्रकाराने त्यांचेही डोळे पाणावले. निर्णयाचे स्वागत आणि अभिनंदनही झाले. मनावरचे ओझे हलके झाल्याचा आनंद अनुभवतो आहे अशा भावना प्रा. शेळके यांनी व्यक्त केल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख