latur deshmukh | Sarkarnama

घसरलेल्या मतदानाने लातुरात परिवर्तनाची आशा धूसर

अरविंद रेड्डी - सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

लातूर : महापालिकेच्या मतदानाला जसा तीव्र उन्हाचा फटका बसला, तसा तो उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर भाजपला बसण्याची शक्‍यता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदे पाठोपाठ महापालिकेत भाजपचे कमळ फुलवून कॉंग्रेसमुक्त लातूर या भाजपच्या मोहिमेला यावेळी ब्रेक लागू शकतो अशी परिस्थिती आहे. मतांचा घसरलेला टक्का, कॉंग्रेसचे सक्षम विरुद्ध भाजपचे नवखे उमेदवार, परिवर्तन घडवण्यासाठी मध्यमवर्गीय मतदार घराबाहेरच न पडणे या सगळ्या बाबी भाजपच्या परिवर्तनावर पाणी फिरवण्यास पूरक ठरू शकतात.

लातूर : महापालिकेच्या मतदानाला जसा तीव्र उन्हाचा फटका बसला, तसा तो उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर भाजपला बसण्याची शक्‍यता आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदे पाठोपाठ महापालिकेत भाजपचे कमळ फुलवून कॉंग्रेसमुक्त लातूर या भाजपच्या मोहिमेला यावेळी ब्रेक लागू शकतो अशी परिस्थिती आहे. मतांचा घसरलेला टक्का, कॉंग्रेसचे सक्षम विरुद्ध भाजपचे नवखे उमेदवार, परिवर्तन घडवण्यासाठी मध्यमवर्गीय मतदार घराबाहेरच न पडणे या सगळ्या बाबी भाजपच्या परिवर्तनावर पाणी फिरवण्यास पूरक ठरू शकतात. देशमुख विरुद्ध निलंगेकर यांच्या लढाईत देशमुख बाजी मारतील आणि स्पष्ट बहुमत मिळाले नाही तरी कॉंग्रेस महापालिकेची सत्ता मिळवेल असा अंदाज आहे. 

लातूर महापालिकेतील 70 जागांसाठी काल 57.90 टक्के एवढे मतदान झाले. 40-41 अंशावर पारा असल्याने मध्यमवर्गीय मतदारांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले आणि त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाला. वाढीव मतदान हे नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते हा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर याचा फटका परिवर्तनाच्या मोहिमेवर निघालेल्या भाजपलाच अधिक बसू शकतो.2012 मध्ये महापालिकेसाठी 63 टक्के एवढे मतदान झाले होते. तेव्हा कॉंग्रेस समोर कुठल्याच पक्षाचे आव्हान नसल्यामुळे बहुमतासह निर्विवाद 
सत्ता कॉंग्रेसने आणली होती. दरम्यान पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, आणि कॉंग्रेससाठी सोपा वाटणारा पेपर अवघड बनला. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे भाजपने जिल्ह्याचे पालकत्व दिले आणि त्यांनी चमत्कार घडवला. जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा परिषदेत देखील बहुमताने सत्ता मिळवली. मुख्यमंत्र्यांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी महापालिका ताब्यात घेऊन कॉंग्रेसचे लातूरातील संस्थान खालसा करण्याचा विडा उचलला खरा पण महापालिकेत सत्तेचे कमळ फुलणे तितकेसे सोपे नाही हे काल झालेल्या मतदानावरुन स्पष्ट होते. 
कॉंग्रेसमय भाजप 
संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार अमित देशमुखांच्या कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी लातुरात फोडाफोडीचे राजकारण केले. मुळात त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता. महापालिकेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या 66 पैकी 50 उमेदवार हे आयात केलेले आहेत. यात सर्वाधिक कॉंग्रेसमधून आलेले आहेत. त्यामुुळे भाजपवर कॉंग्रेसमय भाजप असा आरोप झाला. कॉंग्रेस उमेदवारांच्या तुलनेत भाजपचे उमेदवार नवखे, अननुभवी, जनमानसात प्रतिमा नसलेले आणि विशेषतः कॉंग्रेस उमेदवारा इतके सक्षम नव्हते अशी देखील चर्चा होती. वॉर्ड व नव्या प्रभाग रचनेची माहिती व त्या भागातील मतदारांशी नाळ नसलेले विरुद्ध कॉंग्रेसचे मातब्बर असा हा सामना होता. त्यामुळे निलंगेकरांचे "झिरो टु हिरो' होण्याचे स्वप्न अगदीच धुळीस मिळेल असे नाही, पण महापालिकेत भाजपचा महापौर बसविण्याच्या त्यांच्या आशेवर पाणी फिरणार असे दिसते. 
देशमुख गड राखणार? 
नगरपालिका व जिल्हा परिषदेतील पराभवाने लातुरातील देशमुखी संपणार असे वातावरण तयार करण्यात आले होते. जहाज बुडणार असे दिसताच कॉंग्रेसमधील सैन्य बाहेर पडायला सुरवात झाली होती. अनेकांनी भाजपची वाट धरत कॉंग्रेसला हात दाखवला. पण जहाजाचे कर्णधार अमित देशमुख यांनी धडकणाऱ्या लाटांमधून सुखरूप मार्ग काढला. जहाज डुबणार नाही याचा विश्‍वास कॉंग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांना देण्यात ते यशस्वी ठरले. स्वपक्षातील गळती रोखून त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेनेलाच सुरुंग लावला. "अभी नही तो कभी नही' हे ध्यानात आल्यावर ते मैदानात उतरले आणि भाजपवर तुटून पडले.शेवटच्या टप्यात बंधू रितेश देशमुख यांना प्रचारात उतरवत माहौल तयार 
केला. कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार मतदान केंद्रापर्यंत कसा आणायचा याचा दांडगा अनुभव कॉंग्रेसपाशी असल्यामुळे ते काम त्यांनी फत्ते केले. प्रचंड ऊन आणि लग्नाची दाट तिथी या दोन गोष्टी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडतील आणि महापालिकेवरील कॉंग्रेसचा झेंडा कायम राहील असा अंदाज आहे. 

कोणत्या पक्षाला किती जागा (अंदाज) 
एकूण जागा 70 
कॉंग्रेस- 30 ते 35 
भाजप- 22 ते 25 
राष्ट्रवादी 06 ते 10 
शिवसेना 02 ते 04 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख