latur corporation | Sarkarnama

पैसे वाटल्याचा आरोप करत लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लातूर : महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपल्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास पैसे वाटत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या 

लातूर : महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार काल संपल्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास पैसे वाटत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या 
कार्यकर्त्यांनी वॉर्ड क्रमांक दोनमध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर आज दुपारी पुन्हा पैसे वाटत असल्याचा आक्षेप घेत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवार शीतल मालू यांचे पती विनोद मालू यांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. लातूर महापालिकेची लढाई आता मुद्यावरुन गुद्यावर आल्याचे यावरुन स्पष्ट होते. या मारहाणीविरोधात भाजप व कॉंग्रेसकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रकिया करत आहेत. 

लातूर महापालिकेसाठी उद्या, बुधवारी (ता.19) मतदान होणार आहे. कॉंग्रेसचे आमदार व माजी राज्यमंत्री अमित देशमुख व भाजपचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. रात्री उशिरा प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे कार्यकर्ते एका चौकात चहा पीत उभे असताना तिथे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आले आणि तुम्ही पैसे वाटत असल्याचा आरोप करत महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रात्रीची वाद शांत होत नाही तोच, आज दुपारी पुन्हा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवार शीतल मालू यांचे पती विनोद मालू यांच्यावर मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत मारहाण केली. भाजप कार्यकर्त्यांना कॉंग्रेसकडून मारहाण झाल्यामुळे भाजपमध्ये संतापाचे वातावरण असून दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख