latur corporation | Sarkarnama

लातूरमध्ये कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

लातूर ः महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष वेगाने कामाला लागले आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदेतील दारूण पराभवानंतर कॉंग्रेसला महापालिकेत विजयाची गुढी उभारावी लागणार आहे. तसे न झाल्यास लातूर जिल्हा भाजपमय व कॉंग्रेसमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी चिंता कॉंग्रेसच्या गोटातूनच व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी होणाऱ्या साठमारीत लातूरचे अमित भैय्या व निलंग्याचे संभाजी भैय्या यांच्यात खरा सामना रंगणार असून कॉंग्रेससाठी तर ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. 

महापालिकेसाठी 19 रोजी मतदान व 21 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर 2012 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसने बहुमतासह पालिकेवर वर्चस्व मिळविले होते. विद्यमान सभागृहात कॉंग्रेसचे 49, राष्ट्रवादीचे 13, शिवसेनेचे 6 आणि रिपाइंचे दोन सदस्य आहेत. केंद्र व राज्यात सत्ताबदलानंतर पालिकेतही सत्ताबदलाचे वारे जोरात वाहत आहेत. त्याची चाहूल नगरपालिका व नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेत लागली आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला राष्ट्रवादीशी लढत द्यावी लागली होती. परंतु राजकीय परिस्थिती बदलल्याने 2012 मध्ये एकही सदस्य निवडून न आलेला भाजप सत्तेचा प्रबळ दावेदार बनला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ताब्यातून गेली असली तरी महापालिका आपल्याकडेच राखण्यासाठी आमदार अमित देशमुख यांनी कंबर कसली आहे. पक्षाला लागलेली गळती रोखत आता भाजपला रोखण्याची रणनीती ते आखत आहेत. तर ती भेदण्यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील विजयाचा उत्साह घेऊन जोमाने कामाला लागले आहेत. आधी कॉंग्रेस आणि आता राष्ट्रवादी, शिवसेनेला सुरुंग लावत मोठे मासे भाजपमध्ये आणण्यात त्यांना यश आले. पुढे कॉंग्रेसला आणखी धक्‍के देण्याची तयारी निलंगेकरांनी केली आहे. जिल्हा परिषदेत एकत्र लढलेले कॉग्रेस-राष्ट्रवादी महापालिकेत आघाडी करतात की स्वबळावर लढतात यावरही यशाचे गणित अवलंबून राहणार आहे. 
कॉंग्रेससाठी "करो या मरो' ची स्थिती 
जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खालेल्या कॉंग्रेससाठी महापालिकेच्या निमित्ताने शेवटची संधी राहणार आहे. या निवडणुकीतील निकालावरच कॉंग्रेसचे व आमदार देशमुख यांचे जिल्ह्यातील अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे कॉंग्रेसपुढे "करो या मरो' सारखी स्थिती निर्माण झाली आहे. अमित देशमुख विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक म्हणून लातूर महापालिकेकडे बघितले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख