लातूरला इच्छुकांमुळे सभापती निवडीत चुरस, कुणाला संधी याबद्दल कार्यकर्त्यांना उत्सुकता

धीरज देशमुख यांच्या जागी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रागिनी पाटील यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. तर बाभळगावला पहिल्यांदाच सभापतिपदाची संधी चालून आल्याने सरस्वती पाटील यांचा विचार होऊ शकतो. गातेगावच्या चव्हाण यांचे नावही चर्चेत असल्याने चुरस निर्माण झाली आहे.
लातूरला इच्छुकांमुळे सभापती निवडीत चुरस, कुणाला संधी याबद्दल कार्यकर्त्यांना उत्सुकता

लातूर : पंचायत समितीच्या सोमवारी (ता.30) होणाऱ्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, कॉंग्रेसचे नेते या पदावर कोणाला संधी देतात, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. सभापतिपदासाठी बाभळगाव गणाच्या सदस्या सरस्वती पाटील व एकुरगा गणाच्या सदस्या रागिनी पाटील यांच्यात स्पर्धा आहे. गातेगाव गणाच्या ज्योती चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून उपसभापतिपदासाठी विद्यमान उपसभापती दत्तात्रय शिंदे हे दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक असल्याची चर्चा होत आहे. 

सभापतिपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पंचायत समितीत कॉंग्रेसचे बहुमत आहे. समितीच्या वीस सदस्यांत दहा कॉंग्रेस, सात भाजप व तीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत. यात राष्ट्रवादीच्या सदस्यांची कॉंग्रेसलाच साथ असणार आहे. यामुळे आमदार अमित देशमुख हे कोणाच्या गळ्यात सभापती व उपसभापतिपदाची माळ टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांचे गाव असलेल्या बाभळगावातून सरस्वती पाटील इच्छुक असून त्यांचे बंधू आमदार धीरज देशमुख हे पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या एकुरगा गटातील सदस्या रागिनी पाटीलही इच्छुक आहेत. आमदार झाल्यानंतर धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. यामुळे धीरज देशमुख यांच्या जागी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रागिनी पाटील यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. तर बाभळगावला पहिल्यांदाच सभापतिपदाची संधी चालून आल्याने सरस्वती पाटील यांचा विचार होऊ शकतो. गातेगावच्या चव्हाण यांचे नावही चर्चेत असल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

उपसभापतिपदासाठी चौघे इच्छुक 
उपसभापतिपदासाठी हरंगुळ खुर्दचे सदस्य प्रकाश उफाडे, महापूरचे रघुनाथ शिंदे, पाखरसांगवीचे राम चामे यांची नावे चर्चेत असली तरी विद्यमान उपसभापती दत्तात्रय शिंदे हे सलग दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. माजी आमदार वैजनाथ शिंदे पुत्र असल्याने नेत्यांकडून त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी झाली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हाती काही लागण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तीनही महिला सदस्य असून, यातील बोरीच्या सदस्या मागच्या सभापती निवडीच्या वेळी गैरहजर राहिल्या होत्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com