प्रसाद घ्यायला गेले आणि तीस हजारांचा कर वसूल केला, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची तप्तरता... - Latur collectors went to pooja for taking prasad and collected a tax of thirty thousand, | Politics Marathi News - Sarkarnama

प्रसाद घ्यायला गेले आणि तीस हजारांचा कर वसूल केला, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची तप्तरता...

हरी तुगावकर
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

...........

लातूर : जिल्हाधिकारी जी.श्रीकांत हे आपल्या काम करण्याच्या अनोख्या पध्दतीमुळे चांगलेच प्रसिध्द आहेत. त्यांनी पुन्हा आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे. शहरातील एका परिचिताकडे वैष्णोदेवीचा प्रसाद घेण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाता जाता संबंधिताकडे घराचा कर भरला आहे का ? यांची विचारणा केली. त्याने नाही म्हटल्यावर कर भरणा पावतीपुस्तक मागवून घेत यजमानास तीस हजार रुपये कर भरायला लावत आपले कर्तब्य बजावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. 

 

सर्वसामान्य लोकांसाठी आपला खाजगी मोबाईल क्रमांक जाहीर करणे, मुलाच्या वाढदिवसांत जुन्या जमान्यातील चित्रपट कलाकारांचा गेटअप करत रंगत आणणे या पासून नुकत्याच झालेल्या शासकीय सांस्कृतिक विभागीय स्पर्धांमध्ये तानाजी या ऐतिहासिक चित्रपटातील पात्र साकारत त्यांनी केलेले भन्नाट नृत्य प्रत्येकाच्या आठवणीत आहे. जिल्हाधिकारी जेवढे सरळ, साधे तितकेच कर्तव्यनिष्ठ देखील असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. 

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांना एका स्थानिक परिचिताने आपल्या घरी प्रसादासाठी बोलावले होते. नुकतेच वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन परतल्यामुळे संबंधिताने घरी प्रसाद आणि स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. जी.श्रीकांत यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मनोभावे प्रसादही घेतला. दरम्यान, त्यांनी यजमान व्यक्तीकडे इमारतीचा मालमत्ता कर भरणा केला का ? याची विचारणा केली. कर भरला गेला नसल्याचे समजताच त्यांनी तातडीने कराचे तीस हजार रुपये भरण्याची संबंधितांना सूचना केली. लगोलग पावती पुस्तक मागवून जागेवर करभरणा करून घेतला. 

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. तीन महिन्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही. गेल्या काही महिन्यापासून मालमत्ता कर व गाळे भाडेवाढीच्या संदर्भात तक्रारी आहेत. यात 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने मालमत्ता करात थकबाकीवरील सर्व व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. गाळेधारकांना रेडिरेकनरच्या दरात 50 टक्के सवलत देण्याचाही निर्णयही घेतला. महापालिकेचे आयुक्त एम. डी. सिंह यांची दहा दिवसापूर्वी यवतमाळला बदली झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडेच आयुक्तपदाचा पदभार आहे. तीन दिवसापूर्वी महापालिकेने केलेल्या सवलतीच्या ठरावाची प्रत जी. श्रीकांत यांच्याकडे आली. त्यामुळे सवलती दिल्या आहेत आता तातडीने कराची वसुली करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. केवळ आदेश काढून ते थांबले नाहीत तर गुरुवारी स्वतः रस्त्यावरही उतरले आणि हरिभाऊनगर भागातील एका व्यक्तीच्या घरी वैष्णवी देवीचे दर्शन, प्रसाद घेऊन करवसुली मोहिमेचा श्रीगणेशाही केल्याची चर्चा या निमित्ताने लातूर शहरात होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख