Latur collector J. Shrikant gives a helping hand to a old woman | Sarkarnama

 आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ  !

शिवशंकर काळे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

"एकुलता एक मुलगा सांभाळत नाही. लेकीच्या गावावरून येत असताना भारी गाडीतून उदगीरपर्यंत गेले. तलाठीसाहेब घरी आल्यानंतर मला आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीत बसल्याचे कळाले. त्यांनी माझ्या अडचणी जाणून घेतल्या. मला खूप आधार वाटला. त्यांच्या रूपाने देवाने माझ्यासाठी दुसरा मुलगा पाठवून दिला.''
-सोन्याबाई देवकत्ते, धोंडवाडी, ता. जळकोट 

"वाहनाचा दिवा गेल्याने आमच्या वाहनालाही लोक हात दाखवितात. आजींनी हात केला व त्यांना आम्ही वाहनात घेतले. आजीला भेटून आनंद झाला. त्यांनी आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांना मी तहसीलदार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना तहसीलदार कोण असतो, हेही माहीत नव्हते. संकोच न करता त्यांनी अडचणी सांगितल्या. मला त्या पटल्या. वेगळ्याने स्थळपाहणी करण्याची गरज भासली नाही. यामुळे त्यांना श्रावणबाळ योजनेतून अनुदान मंजूर करण्याचे आदेश दिले.''
-जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर.

* खासगी वाहन समजून दाखविला हात
* जी. श्रीकांत यांनी केली आस्थेने विचारपूस
* "श्रावणबाळ'चे अनुदान तातडीने केले मंजूर

जळकोट : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे गुरुवारी (ता. सहा) बैठकीसाठी लातूरहून उदगीरला जात असताना अंजनसोडा पाटीवर (ता. उदगीर) खासगी प्रवासी वाहन समजून त्यांच्या कारला एका आजीबाईने हा दाखविला. जिल्हाधिकाऱ्यांनी आजीबाईंना कारमध्ये घेतले. अंजनसोडा ते  उदगीर प्रवासात आजीबाईंची सर्व हकिगत जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली आणि शुक्रवारी (ता. सात) आजीबाईंना श्रावणबाळ योजनेतून अनुदान मंजूर झाले.

सोन्याबाई पंढरी देवकत्ते (वय 68, रा. धोंडवाडी, ता. जळकोट) असे या महिलेचे नाव आहे. हा अनोखा अनुभव जिल्हाधिकारी श्रीकांत यांना गुरुवारी लातूर ते उदगीर प्रवासात आला. अंजनासोंडा पाटीवर लेकीच्या गावावरून धोंडवाडी (ता. जळकोट) या आपल्या गावी निघालेल्या सोन्याबाई देवकत्ते या बसची वाट पाहत उभ्या होत्या. मिळेल त्या वाहनाने जाण्याचा त्यांचा बेत होता. यातच तेथून जात असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला त्यांनी हात दाखवला. 

त्यानंतर वाहन थांबले व स्वतः जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी उतरून त्या महिलेला वाहनात बसवले. त्या महिलेची श्रीकांत यांनी आस्थेने विचारपूस केली. तिला तहसीलदार कोण असतो, सरपंचांचे काम काय असते, हेही माहीत नव्हते. महिलेच्या हातात पिशवी होती व त्यात तिच्या मुलीने दिलेले खाद्यपदार्थ व तुपाचा डबा होता. महिलेची विचारपूस करताना जिल्हाधिकाऱ्यांनी डब्यातील तूप चाखूनही पाहिले. महिलेला तिचा एकुलता एक मुलगा सांभाळत नसल्याचे, तसेच तिने संजय गांधी किंवा अन्य योजनेचा लाभ घेतला नसल्याचे समजले. 

उदगीरला गेल्यानंतर श्रीकांत यांनी त्या महिलेला तातडीने अनुदान मंजूर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रशासनाकडून वेगवान हालचाली झाल्या. तहसीलदार शिवनंदा लंगडापुरे यांच्या पुढाकाराने घोणसीचे तलाठी डी. एच. करमले यांनी धोंडवाडी येथे जाऊन शुक्रवारी त्या महिलेकडून श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज भरून घेतला आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा केली. लवकरच महिलेला योजनेतून अनुदान मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख