नियोजन अधिकारी बनले `कुली`फेम अभिताभ तर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बनले सुपरस्टार !

समाजात मुलीचा सन्मान वाढवण्याचे प्रयत्न करताना त्याची सुरवात स्वतःपासून केल्याचाही आनंद आहे.मोठे झाल्यानंतर मागे वळून पाहताना स्वतःच्या वाढदिवसानिमित्त झालेले वेगळे कार्यक्रमआठवून मुलीला निश्चित मुलगी म्हणून जन्माला आल्याचा व मातापित्यांचा अभिमान वाटेल. जन्मदाता म्हणून चांगल्या आठवणीतून मुलींना जगण्याचे बळ देण्याचे प्रयत्न सर्वांनी जाणीवेने केले पाहिजेत.- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर.
collector-G-shrikant
collector-G-shrikant

लातूर   : मुलीच्या जन्माचे केवळ स्वागत करून  न थांबता समाजात मुलीचा  सन्मान वाढावा यासाठी  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत दरवर्षी नवे  फंडे आणतात .आपली   मुलगी शाश्वती हिचा वाढदिवस साजरा करताना दरवर्षी काहीतरी वेगळे करून हा दिवस संस्मरणीय बनवतात . 

यंदा शाश्वतीचा  तिसरा वाढदिवस होता . यावर्षीची वाढदिवसाची थीम होती १९७०च्या दशकातील बॉलिवूड . यानिमित्त श्रीकांत व त्यांच्या कुटुंबियांनी सत्तरच्या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील अभिनेत्यांची वेशभूषा साकारली.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वेशभूषा साकारत   श्रीकांत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाला कृतीची जोड दिली. यामुळे जिल्हाधिकारी निवासस्थानात सत्तरच्या दशकातील बॉलिवूड अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

सत्तरच्या दशकात लांब केस, बेलबॉटम पॅंट, रंगबिरंगी शर्ट, रंगाचा चष्मा, कॉलरच्या वेगळ्या फॅशनचा `जमाना` होता. अभिनेते व अभिनेत्रींच्या वेशभूषेतूनच समाजात फॅशन आली. वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्वतःसह कुटुंबिय व अधिकारी कर्मचाऱ्यांना सत्तरच्या दशकात नेले .

करिअरच्या सुरवातीपासून प्रत्यक्ष कामकाजात जिल्हाधिकारी श्रीकांत वेगळेपण जपत आहेत. हे वेगळेपण त्यांनी वैयक्तिक आयुष्यातही जपल्याचे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त दिसून आले.  

 समाजात मुलीचा सन्मान वाढावा तसेच तिला मुलगी म्हणून जन्माला आल्याचा अभिमान वाटावा, यासाठी   जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी मुलीचा वाढदिवस  चांगल्या रीतीने  साजरा करण्याचे धोरण ठेवले आहे . 

मुलगी झाल्यानंतर तिच्या जन्माचे स्वागत करतानाच तिचा पहिला वाढदिवस त्यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तिला प्राणी खूप आवडत असल्याने पहिल्या वाढदिवसानिमित्त `जंगला`चे चित्र उभे करण्यात आले. विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीसोबत चित्रही लावण्यात आले. कार्यक्रमात सहभागी पाहुणे व कुटुंबिय प्राण्यांचे मास्क घालूनच आले होते . स्वतः श्रीकांत हे `वाघ` व पत्नी सोनम या `ससा` झाल्या होत्या.

 दुसऱ्या वाढदिवसानिमित्त दाक्षिणात्य सर्वांनी वेशभूषा करून दाक्षिणात्य भोजन घेतले. यामुळे अकोल्यात पहिल्यांदाच `चेन्नई`तील परिवाराचा प्रत्यय आला होता . दोन दिवसापूर्वीचा तिसरा वाढदिवस १९७० ते १९८० दशकातील बॉलिवूडमधील गणवेशाचा `वेगळा विषय` घेऊन साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्तरच्या दशकात प्रदर्शित चित्रपटाचे बॅनर्स व प्रकाश व्यवस्थेतून बॉलिवूडचे वातावरण तयार करण्यात आले. त्या काळातील स्कुटरही कार्यक्रमाच्या ठिकाणी होती. त्यावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह फोटोसेशन केले. 

 श्रीकांत यांच्या वेशभूषेमुळे ते काहीवेळ ओळखूच आले नाहीत. त्यांच्या वडीलांनी `रजनीकांत` तर पत्नी सोनम यांनी `हेमामालिनी`ला साजेशी वेशभूषा साकारली. पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारीही सत्तरच्या दशकातील वेशभूषेतच सहभागी झाले होते. 

काहींनी स्वतःच्या तारूण्याचा तर काहींनी आपल्या आईवडीलांच्या तारूण्याच्या काळाचा अनुभव घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांनी `कुली` चित्रपटातील अभिताभ बच्चन यांची वेशभूषा साकारून सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्याच काळातील गीतांवरील नृत्य व गीतांनी कार्यक्रमात रंगत आली.

 या कार्यक्रमापूर्वी मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण त्यांनी केले . आणि    बालसदनातील बालकांना मुलीच्या वाढदिवसानिमित्त जी . श्रीकांत यांनी उबदार कपड्यांचे वाटप केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com