latur bjp and district president | Sarkarnama

नाराज रमेशअप्पा कराडांची लातूर जिल्हाध्यक्षपदी वर्णी ; गुरुनाथ मगे शहराध्यक्ष

विकास गाढवे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

.............

लातूर : महिन्यापासून रखडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी गुरूवारी (ता. 13) बिनविरोध पार पडल्या. शहर जिल्हाध्यक्षपदी गुरूनाथ मगे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रमेशअप्पा कराड यांची निवड करण्यात आली. दोन्ही पदासाठी पक्षातील मातब्बर व इच्छुकांनी गर्दी केली होती. मात्र, नेत्यांनी संघाच्या मुशीत वाढलेले निष्ठावंत कार्यकर्ते मगे यांच्या गळ्यात शहर जिल्हाध्यक्षपदाची माळ टाकली. तर विधानसभा निवडणूकीत ऐनवेळी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने नाराज झालेले कराड यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. 

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरूवारी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन कोअर कमिटीशी चर्चा केली व त्यानंतर दोघांची निवड घोषित केली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या निवडीची चर्चा सुरू झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीनंतर या निवडी होणार होत्या. मात्र, पक्षांत्तर्गत बंडाळी वाढल्याने त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या विषय सभापती निवडीनंतर शहर-जिल्हाध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. यासाठीच दोन सभापतींकडील विषयाचे वाटप अध्यक्षांनी रोखून धरले होते. अखेर गुरूवारी मुहुर्त लागला आणि दोन्ही नियुक्‍त्या करण्यात आल्या. 

शहर जिल्हाध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे माजी सभापती शैलेश गोजमगुंडे, माजी शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर, नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, देविदास काळे, मोहन माने, गुरूनाथ मगे, प्रदीप मोरे, प्रदिप सोलंकी व अनिल पतंगे यांनी मुलाखती दिल्या. मात्र, विद्यार्थी परिषदेपासून काम करत गेली आठ वर्ष भाजपमध्ये कार्यरत असलेल्या मगे यांनी बाजी मारली. निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळाल्याचे समाधान पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार विनायकराव पाटील, ऍड. भारत चामे, बालाजी पाटील चाकूरकर व किरण उटगे यांनी मुलाखती दिल्या. 

संभाजी पाटील निलंगेकर यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा होती. परंतु ते मुलाखतीला गैरहजर राहिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. रमेशअप्पा कराड यांना संधी देऊन जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपासून पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजप नेत्यांनी केला आहे. मागील दोन टर्म भाजपच्या वाट्याला असलेला लातूर ग्रामीण मतदारसंघ ऐनवेळी शिवसेनेला देण्यात आला. यात वरिष्ठ नेत्यांनी अनेक तडजोडी करून एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुमरॅंग होऊन पक्षाचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी झाले होते. आता कराड यांना संधी देऊन विधानसभा निवडणूकीत झालेली चुक सुधारण्याचा प्रयत्न पक्षाने केल्याचे दिसते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख