latur band | Sarkarnama

रेल्वे विस्तारीकरणाच्या विरोधात लातूरमध्ये बंद

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

लातूर : लातूरकरांच्या विरोधात काल उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आज (ता.5) लातूर- मुंबई एक्‍स्प्रेसचा बिदरपर्यंत विस्तार करून हक्काची गाडी पळवल्याच्या निषेधार्थ लातुरात बंद पाळण्यात आला.

लातूर : लातूरकरांच्या विरोधात काल उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आज (ता.5) लातूर- मुंबई एक्‍स्प्रेसचा बिदरपर्यंत विस्तार करून हक्काची गाडी पळवल्याच्या निषेधार्थ लातुरात बंद पाळण्यात आला.

व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवत या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन करत होते. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. दरम्यान, एकाच रेल्वेवरून जिल्ह्यातील दोन शहर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 9 मे रोजी लातुरात रेल रोको आंदोलन देखील करण्यात येणार आहे. 

दहा वर्षापासून लातूर - मुंबई एक्‍स्प्रेस ही रेल्वे सेवा फायद्यात सुरू आहे. क्षमतेपेक्षा दीडपट प्रवासी या गाडीने प्रवास करत असल्याने रेल्वे बोर्डाला 120 टक्‍क्‍याहून अधिक उत्पन्न मिळते. प्रवाशांचा असा प्रतिसाद असताना कर्नाटक राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका पाहता बिदरचे खासदार भगवंत खुब्बाट यांनी लातूर-मुंबई एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत वाढवून घेतली. परिणामी ही गाडी तिकडूनच भरून येत असल्याने लातूरकरांना या रेल्वेमध्ये पाय ठेवायला देखील जागा मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी वाढल्या आहेत. बिदरपर्यंत गाडीचा विस्तार झाल्याने उदगीरसह, देवणी, चाकूर आदी काही तालुक्‍यातील नागरिकांची सोय झाली असली तरी लातूरकरांचा या विस्ताराला प्रचंड विरोध आहे.

यातून खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे प्रकार देखील लातूरमध्ये घडले. यातून उदगीर विरुद्ध लातूर असा नवा संघर्ष निर्माण झाला आहे.

लातूरकरांच्या भूमिकेचा निषेध म्हणून काल उदगीरकरांनी शहर बंद ठेवून निषेध केला होता. त्याला प्रत्युत्तर देत लातूरमध्ये देखील आज बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. सकाळी नऊ वाजल्यापासूनच लातूर एक्‍स्प्रेस बचाव कृती समितीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या विभागात गटा गटाने बंदचे आवाहन करीत फिरत होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख