Latur : Ashok Govindpurkar gets another chance in corporation | Sarkarnama

लातुरात तात्यांना पुन्हा लॉटरी : दहा दिवसात संधीचे सोने करणार !

विकास गाढवे 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

खंडपीठाने बुधवारी दिलेल्या आदेशामुळे  अशोक गोविंदपूरकरांचे  स्थायी समितीचे सदस्य व सभापतीपद कायम राहिले. आता त्यांच्याच उपस्थितीत 14 सप्टेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात येणार आहे. यात चिठ्ठी त्यांना साथ देईल की नाही, याची लातूरकरांना उत्सुकता आहे.

लातूर  : चिठ्ठीद्वारे नशीबाने महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती होऊन चिठ्ठीद्वारेच निवृत्त झालेले अशोक गोविंदपूरकर उर्फ तात्यांना पुन्हा सभापती पदाची लॉटरी लागली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 15 जून रोजी अॅड. शैलेश गोजमगुंडे यांची सभापतीपदी झालेली निवड तसेच स्थायी समितीच्या सदस्य निवडी व निवृत्तीचेही कामकाज रद्द केले आहे.

 श्री. गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षेखालील स्थायी समितीची निवड प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश खंडपीठाने बुधवारी (ता. पाच) दिले आहेत. यामुळे तात्यांच्या नशीबातील राजयोगाची चर्चा पुन्हा घडून येत आहे. 

दरम्यान खंडपीठाच्या आदेशामुळे दहा दिवस मिळालेल्या संधीचे सोने करणार असून लातूरकरांच्या विकासाचे निर्णय घेणार असल्याचे बुधवारी कॉंग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत गोविंदपूरकर यांनी सांगितले. महापालिकेत भाजपाचे बहुमत असले तरी स्थायी समितीत सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसचे  समान सदस्य आहेत. यामुळे गेल्यावेळेस चिठ्ठीद्वारे काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर सभापतीपदी निवडून आले. 

याची सत्तेत असलेल्या भाजपाला वेळोवेळी अडचण झाली. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका  कायद्यातील तरतुदीचा सोयीचा अर्थ लावून सत्ताधाऱ्यांनी 15 जून रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताचा आधार घेऊन अॅड.  गोजमगुंडे यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड केली होती. त्याविरूद्ध अॅड. दिपक सुळ व विजय साबदे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.

 याचिकेच्या बुधवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने अॅड. गोजमगुंडे यांची निवड रद्द करून त्यापूर्वी स्थायी समिती सदस्यांच्या निवडी व निवृत्तीचे कामकाजही रद्द केले आहे. स्थायी समिती सदस्य निवृत्ती, निवडी व सभापती निवडीची प्रक्रिया नव्याने घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यामुळे पूर्वीचे स्थायी समितीचे सदस्य व सभापती तुर्त कायम राहिले असून सदस्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया 14 सप्टेंबर रोजी श्री. गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

यापूर्वी त्यांच्याच अध्यक्षतेखालील झालेल्या सदस्य निवृत्तीच्या प्रक्रियेत चिठ्ठीने त्यांना हुलकावणी दिली. त्यांचा नंबर निवृत्त सदस्यांत लागला. चिठ्ठीत त्यांचेही नाव आल्याने त्यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागले होते. श्री. गोविंदपूरकर यांच्या राजकीय प्रवासात अनेक पदांच्या निवडीत समान मते पडून त्यांना सतत चिठ्ठीने साथ दिली होती. त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्य निवडीत त्यांना संधी मिळाली नाही.

 खंडपीठाने बुधवारी दिलेल्या आदेशामुळे त्यांचे स्थायी समितीचे सदस्य व सभापतीपद कायम राहिले. आता त्यांच्याच उपस्थितीत 14 सप्टेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात येणार आहे. यात चिठ्ठी त्यांना साथ देईल की नाही, याची लातूरकरांना उत्सुकता आहे.

दहा दिवसाच्या काळात चार महिन्यापासून प्रलंबित असलेली लोकाभिमुख कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खंडपीठाच्या आदेशाविरूद्ध  सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करताच महापालिका खंडपीठाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे त्यांनी बुधवारी सभापती या नात्याने स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख