Late Vilasrao Deshmukh's Nashik Visit | Sarkarnama

नाशिककर म्हणाले पुन्हा मुख्यमंत्री व्हा...अन्‌ विलासराव मुख्यमंत्री झाले! 

संपत देवगिरे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

विधानसभा निवडणुकीत 1995 मध्ये पस्तीस हजार मतांनी पराभूत झाल्यावर 1999 मध्ये राज्यातील सर्वाधिक 91000 मताधिक्‍याने निवडणूक जिंकुन (कै.) विलासराव देशमुख यांनी राजकीय कमबॅक केले व ते मुख्यमंत्री झाले. मात्र 2003 मध्ये राजीनामा द्यावा लागल्याने काहीसे निराश होते. यावेळी ते लातुरहून शिर्डीमार्गे मुंबईला निघाले होते. यावेळी छाजेड यांनी त्यांना भोजनासाठी नाशिकला बोलावले होते.

नाशिक : (कै) विलासराव देशमुख यांनी पक्षांतर्गत कारणांनी 2003 मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर ते लातुरहुन शिर्डीमार्गे मुंबईला निघाले होते. यावेळी युवक काँग्रेस चळवळीपासूनचे मित्र असलेल्या जयप्रकाश छाजेड यांनी त्यांना नाशिकला भोजनासाठी निमंत्रीत केले. ते आले तेव्हा अल्प वेळेत शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी जमले. एव्हढे मोठे स्वागत पाहून विलासराव अचंबित झाले. निघताना छाजेड म्हणाले, "तुम्ही निघालात. मात्र, आता पुन्हा मुख्यमंत्री व्हायचेच हा निर्धार पक्का करु या'' अन्‌ अवघ्या दीड वर्षात ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. पुढे अनेक गप्पा, मुलाखतींत विलासराव नाशिकच्या या प्रितीभोजनाचा आवर्जून उल्लेख करीत. 

विलासरावांच्या राजकीय कारकीर्दीला युवक काँग्रेसपासून प्रारंभ झाला. या काळात युवक काँग्रेसवर नाशिकच्या विविध नेत्यांचे मोठे वर्चस्व होते. यातील विविध नेते पक्षातील मोठ्या पदांवर पोहोचले. त्यातील विलासरावांचे दोन जिवलग राजकीय सहकारी म्हणजे माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि माजी खासदार (कै) मुरलीधर माने. ते एकमेकांच्या एव्हढ्या संपर्कात असत की त्यांच्यातील स्नेहपूर्ण संवादही एकेरीतच असे. 

विधानसभा निवडणुकीत 1995 मध्ये पस्तीस हजार मतांनी पराभूत झाल्यावर 1999 मध्ये राज्यातील सर्वाधीक 91000 मताधिक्‍याने निवडणूक जिंकुन त्यांनी राजकीय कमबॅक केले व मुख्यमंत्री झाले. मात्र 2003 मध्ये राजीनामा द्यावा लागल्याने काहीसे निराश होते. यावेळी ते लातुरहून शिर्डीमार्गे मुंबईला निघाले होते. यावेळी छाजेड यांनी त्यांना भोजनासाठी नाशिकला बोलावले होते. रात्री साडे नऊला देशमुखांचे सपत्नीक आगमन झाले तेव्हा शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते स्वागताला होते. त्या स्वागताने देशमुखांची निराशा कुठल्या कुठे गेली. त्यांनी भरपुर गप्पा मारल्या. जेवणानंतर मोजक्‍या कार्यकर्त्यांसह निरोपासाठी आलेले छाजेड म्हणाले, आत्ता निश्‍चय करु या, दोन वर्षात गेलेले पद पुन्हा मिळवायचेच. 

विलासराव देशमुख त्यांचे प्रचलीत दिलखुलास हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाले, "नक्की.'' अन्‌ त्यानंतर 2004 मध्येच ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीत नाशिकचे हे स्नेहभोजन 'टर्नींग पॉंईंट' ठरल्याचे त्यांनी पुढे अनेक मुलाखतींत सांगीतले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख