Late Gopinath Munde Office in Mumbai Renovated | Sarkarnama

वंचितांचा वाली अन् वाणी बनण्यासाठी समाजसेवक म्हणून सदैव कार्यरत : पंकजा मुंडे

दत्ता देशमुख 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

बुधवारी लोकनेते (कै.) गोपीनाथराव मुंडे यांच्या वरळी (मुंबई) येथील कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

बीड :  लोकनेते (कै.) गोपीनाथराव मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालयातून अनेकांचे जीवन घडले, यातून अनेकांना जशी राजकीय व सामाजिक दिशा मिळाली तशीच ती मलाही मिळाली. त्यांच्या पश्चात त्यांच्याच प्रेरणेने या कार्यालयाच्या माध्यमातून वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी एक समाजसेवक म्हणून जनसामान्यां करिता सदैव कार्यरत राहणार, असे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 

बुधवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या वरळी (मुंबई) येथील कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तत्पूर्वी प्रज्ञाताई मुंडे, पंकजा मुंडे, डाॅ. अमित पालवे, खासदार डाॅ प्रितम मुंडे,गौरव खाडे, प्रभाकरराव पालवे आदींनी दिवंगत मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यालयाचा शुभारंभ झाला. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, ''लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब, वंचित, पिडितांची कामे केली, त्यांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. मला सुध्दा एक पिता व नेता म्हणून त्यांचेकडून राजकीय व सामाजिक दिशा मिळाली. या कार्यालयाच्या माध्यमातून मी आता त्यांचे सामाजिक कार्य पुढे चालू ठेवणार आहे. मराठवाडयाचा पाणी प्रश्न असो की हिंगणघाटची घटना, ते विषय जसे  हाताळले तसे सामाजिक विषय मी प्राधान्याने हातात घेणार आहे. एक समाजसेवक म्हणून प्रत्येकांना सेवा देत राहणार आहे. जनतेच्या मनात जे स्थान दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी मिळवलं, अगदी त्यांच्याच विचाराचा वसा आणि वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कार्यरत राहू.''

कार्यक्रमास माजी मंत्री विनोद तावडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, जयकुमार रावल, सदाभाऊ खोत, खासदार सुजय विखे, आमदार अतुल भातखळकर, अमित साटम, तुषार राठोड, सुरेश धस, लक्ष्मण पवार, माधुरी मिसाळ, मनिषा चौधरी, नमिता मुंदडा, राजेश पवार, अतुल सावे, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, डाॅ. भागवत कराड, माजी आमदार केशवराव आंधळे, भीमराव धोंडे, रमेशराव आडसकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित होते.  यावेळी 'मुंडे साहेब अमर रहे', 'पंकजाताई मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख