In last three days MP Pritam Munde spent just 5 days in constituency | Sarkarnama

खासदार प्रितम मुंडे तीन महिन्यात केवळ पाच दिवस मतदार संघात

दत्ता देशमुख : सरकानामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

 सध्या जिल्ह्यात पक्षाचे सहा (विधासभेचे पाच आणि परिषदेचा एक) आमदार असले तरी भविष्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय बळ वाढावे यासाठी आणखी घरातलाच एखादा आमदार असावा असे गणित मागच्या वर्षभरापासून बांधले जात आहे .

बीड : निवडणुकांचा माहोल सुरु झाल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींसह इच्छुकांनी कंबर कसत जनसंपर्क वाढविला आहे. मात्र, भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे मागच्या तीन महिन्यांत केवळ पाच दिवस जिल्ह्यात आहेत.

आपण विजयी होऊच या आत्मविश्वासाने त्या निर्धास्त आहेत का ?  त्यांच्या किंवा भाजपच्या  नेतृत्वाच्या डोक्यात काही वेगळी राजकीय गणिते सुरु असल्याने त्यांनी मतदार संघाकडे असा कानाडोळा केला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘ही गर्दी पाहून प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे यांचा पराभव होईल असे कोण म्हणतो? ’,  आणि ‘सर्वे बिर्वे काही नसतो’, असा विजयाचा विश्वास व्यक्त केला होता आणि पक्षांतर्गत विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता.  

 वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि सौंदर्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक डॉ. प्रितम मुंडे या लोकसभा निवडणुकीपूर्वी कधीच राजकारणात सक्रीय नव्हत्या. मात्र,  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे पोटनिवडणुकीच्या रिंगणात रिंगणात अचानक उतरुन विक्रमी मतांनी विजयी झाल्या. मात्र, राजकारण आपला पिंड नसल्याचे सांगणाऱ्या डॉ. प्रितम मुंडे मतदार संघातील जनसंपर्कातही कमी पडू लागल्या. संसदेच्या अधिवेशनातही त्यांच्या गैरहजेरीच्या आणि त्यामुळे पक्षातील बड्या नेत्यांच्या नाराजीच्या बातम्याही अधुन मधून येत असतात. 

दरम्यान, आता आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुक वर्षानंतरर असली तरी विद्यमान आमदार आणि विरोधी पक्षांतील इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसत तयारी सुरु केली आहे. ऐनकेन मार्गे जनसंपर्क सुरु आहे. मात्र, लोकसभा तोंडावर आलेली असताना खासदार प्रितम मुंडे यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर आणि चालु नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळात खासदार मुंडे जिल्ह्यात केवळ पाच दिवस आहेत. या काळात ऊसतोड मजूरांचा मेळावा, पोस्ट पेमेंट बँकेचे उद॒घाटन, दुष्काळी पाहणी दौरा आणि सावरगाव घाट येथे झालेला दसरा मेळावा तसेच या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्या आल्या आणि गेल्याही.

 मागच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे  विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या .   जिल्ह्यात पक्षाचे पाच आमदार आहेत. तसेच, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा महत्वाच्या संस्था ताब्यात आणि भगीनी पंकजा मुंडे यांच्याकडे विरोधकांनाही गळाला लावण्याची आणि समाजाचे मते आपल्याच पारड्यात टाकण्याचे राजकीय कसब असल्याने भिण्याचे काही कारणच नाही असे त्यांना वाटत असावे असेही राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. तसे सावरगावच्या मेळाव्यात खुद्द पंकजा मुंडेंनीच उमेदवारीही कटणार नाही आणि पराभवही होणार नाही असा विश्वास दिलेला असल्याने डॉ. प्रितम मुंडे ह्या निश्चिंत झाल्याचे मानले जाते. 

म्हणूनच कदाचित निवडणुक तोंडावर असतानाही त्यांना मतदार संघात येण्याची गरज वाटत नसावी. त्यांना वरील सर्व बाजू जमेच्या आणि एकतर्फी वाटत असल्यामुळे तरी त्या निर्धास्त असाव्यात असे मानले  जाते .  

अशा वेळी मतदार संघात न येण्यामागे दुसरेही काही राजकीय गणित असावे असाही अंदाज बांधला जात आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाचे सहा (विधासभेचे पाच आणि परिषदेचा एक) आमदार असले तरी भविष्यात पंकजा मुंडे यांचे राजकीय बळ वाढावे यासाठी आणखी घरातलाच एखादा आमदार असावा असे गणित मागच्या वर्षभरापासून बांधले जात आहे .

त्यानुषंगाने माजलगाव किंवा आष्टी मतदार संघातून डॉ. प्रितम मुंडेंना रिंगणात उतरविले जाणार असल्याची चचाही आधून मधून असते. माजलगावच्या आमदारांची ‘कामगिरी आणि आष्टीच्या आमदारांची कायम गडकरी वारी’ यामुळे या दोघांपैकी एकाला पयाय म्हणूनही डॉ. प्रितम मुंडे यांचे नाव पुढे येत असते. कदाचित यावर शिक्कामोर्तब झाले असले तर मग आत्ताच जिल्ह्यात फिरण्यापेक्षा विधानसभेच्या तयारीलाच लागू या विचारातूनही त्या इकडे येत नसाव्यात. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख