अडचणीच्या काळात विरोधकांना मिळालेल्यांची छगन भुजबळांच्या स्वागतासाठी धडपड!

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे भव्य स्वागत अपेक्षीत होतेच. त्याला साजेसे स्वागत झाले. यामध्ये गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने टिकलेले कार्यकर्ते पदाधिकारी होते. हा भुजबळांसह सगळ्यांनाच दिलासा अन्‌ सुखद धक्का होते. ही सर्व मंडळी लांबून भुजबळांना शुभेच्छा देण्यातच समाधानी दिसली.
Crowd Gathered To Welcome Minister Chagan Bhujbal in Yeola
Crowd Gathered To Welcome Minister Chagan Bhujbal in Yeola

येवला  : आता पुन्हा छगन भुजबळ हेवीवेट मंत्री झाल्याने त्यांच्याभोवती मतदारसंघात कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसले. विशेष म्हणजे कालपर्यंत भाजपचे नेते, मंत्री यांची सावली क्षणभरही न सोडणारे अनेक जण निवेदन, शुभेच्छांच्या माध्यमांतून भुजबळांशी जवळीक, स्नेहाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी धडपडत होते. यात काही 'वादग्रस्त' मंडळी तर जराही बाजुला होत नव्हती. मध असले की मधमाश्‍या जमा होतातच, याचा प्रत्यय मंत्री भुजबळांच्या दौऱ्यात नाशिक अन्‌ येवल्याला आला.

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे भव्य स्वागत अपेक्षीत होतेच. त्याला साजेसे स्वागत झाले. यामध्ये गेली पाच वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने टिकलेले कार्यकर्ते पदाधिकारी होते. हा भुजबळांसह सगळ्यांनाच दिलासा अन्‌ सुखद धक्का होते. ही सर्व मंडळी लांबून भुजबळांना शुभेच्छा देण्यातच समाधानी दिसली. मात्र, अडचणीच्या काळात चक्क भाजप नेते, पालकमंत्र्यांपुढे पायघड्या अंथरणाऱ्यांनीही मोठे गुच्छ, झकपक शाली, मागण्याची निवेदने घेऊन भुजबळांना गराडा घातला होता. 

यामध्ये काही तर अगदीच पोलिसांचा पाहुणचार घेतलेली मंडळीही होती. त्यांना स्वतः भुजबळांनी हटकले. बाहेर जाण्याची खूण केली. मात्र, ते हटले नाहीत. ठिय्या देऊन घुटमळतांना दिसले. माजी मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जवळीक असलेले दोन स्वयंघोषीत नेतेही पाच- दहा समर्थकांसह निवेदनाच्या निमित्ताने संवाद करतांना दिसली. असे अनेक होते. दिलासा म्हणजे स्वागताला येणाऱ्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना पदाधिकारी होतेच. तेव्हढ्याच संख्येने भाजपची मंडळी होती. यातून आगामी काळात पुन्हा एकदा 'भुजबळ फार्म' जिल्ह्याचे सत्ताकेंद्र होणार या भावी राजकारणाची चुणुक दिसली.

भुजबळ यांच्या रूपाने 2004 मध्ये येवलेकरांनी प्रथमच लाल दिवा पाहिला. पुढील दहा वर्षे तो अनुभवलाही. त्या काळात भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री होते. त्यामुळे प्रचंड कामे सुरू होती. भुजबळांच्या अवतीभवती सदैव गर्दीचा महापूर असायचा. भुजबळ येथे मुक्कामी असले, की संपर्क कार्यालय गर्दीने गजबजून जायचे. मात्र 2014 मध्ये सत्ता आणि मंत्रिपद गेले. यामुळे काही संधिसाधू कार्यकर्ते दुरावले. अर्थात अनेक प्रामाणिक लोक या काळातही भुजबळ यांच्याबरोबर राहिले. 

आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वावरताना भुजबळ दिसताहेत. पक्षप्रमुख शरद पवार यांनीही त्यांना पहिल्या फळीत शपथ देऊन ते महत्त्वाचे खाते सांभाळतील, याचे संकेत दिल्याने आता आपला आमदार चांगल्या पदावर जाणार, याची सर्वांनाच जाणीव झाली आहे. त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच येवल्यात आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी आणि भेटीसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ जमा झालेले दिसले. नव्हे, तर भुजबळ येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कार्यालय गर्दीने फुल्ल होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com