सहकारातून घराचं स्वप्न फुलवणाऱ्या कुसुमताई !

महाराष्ट्र को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमीटेड मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका होत्या. या काळात जिल्ह्यात अनेक गृहनिर्माण संस्था त्यांच्या प्रोत्साहनाने अस्तित्वात आल्यात व त्यांच्या पुढाकाराने या संस्थांना वित्तपुरवठा होऊन अनेकांना निवारा मिळाला.
सहकारातून घराचं स्वप्न फुलवणाऱ्या कुसुमताई !

अकोला : समाजसेवेला ज्ञानाची जोड देत सहकार व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवारी (ता.30) निधन झालं. आयुष्यभर समाजसेवा हे व्रत समजून शेतकरी, मजुरांच्या सुख-दुखाःत सहभागी होत त्यांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या कुसुमताईंच्या निधनामुळे समाजाची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

डॉ. कुसुमताई कोरपे यांचा जन्म 19 ऑगस्ट 1928 रोजी एका सुशिक्षीत, सुसंस्कृत, सधन शेतकरी कुटूंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांच्या काळातील नामवंत कायदेपंडीत व ख्यातकिर्त राजकीय पुढारी होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री नानासाहेब सपकाळ हे सुद्धा सुविख्यात वकील आणि सहकार सामाजिक व राजकीय नेते होते. डॉ. कुसुमताई ह्या महाराष्ट्राचे अग्रणी नेते तथा महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते दिवंगत सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या धर्मपत्नी होत्या. माहेर व सासर ही दोन्ही घराणी समाजसेवेची व्रतस्थ. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचाही पिंड समाजसेवेचा बनला. शिवाय दोन्ही घराणी सुसंस्कृत व उच्च विद्याविभूषीत असल्याने त्यांचाही ओढा शिक्षणाकडे राहिला. विवाहानंतरही त्यांनी शिक्षण सुरू ठेऊन एम. ए. ची. पदवी संपादन केली. "विदर्भातील 20 व्या शतकातील ग्रामीण नेतृत्वाचा विकास' हा त्यांचा शोध प्रबंध स्वीकारून नागपूर विद्यापीठाने डॉक्‍टरेटची पदवी बहाल करून त्यांना सन्मानित केले होते. 

समाजसेवेला ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील समाजकार्य प्रभावी राहिले. 1957 ते 1967 या दहा वर्षाच्या राजकीय कारकिर्दित त्यांनी अनेक समाजपयोगी भरीव कामे केली. दोन्ही वेळा त्यांना मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांच्या समाजकार्याची पावती दिली. आपला मतदासंघ व जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या, प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडून ते सोडविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला. सिलिंग व कुळकायदा यासंबंधीही त्यांचे कार्य विशेष उल्लेखनिय राहिले आहे. सहकारी चळवळीवर त्यांची प्रगाढ श्रद्धा. जनसामान्यांच्या जीवनात प्रवेश करून त्यांना दिलासा देणारी बाब म्हणून त्यांनी या चळवळीला वाहून घेतले होते. 

मानवी जीवनातील मुलभत गरज "निवारा'. आजच्या अत्यंत महागाईच्या परिस्थितीत अनेकांची घरकुलाची कोमेजलेली स्वप्नं त्यांनी सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील आपल्या अथक सेवेतून साकारली आहेत. 1982-87 या काळात महाराष्ट्र को-ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमीटेड मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका होत्या. या काळात जिल्ह्यात अनेक गृहनिर्माण संस्था त्यांच्या प्रोत्साहनाने अस्तित्वात आल्यात व त्यांच्या पुढाकाराने या संस्थांना वित्तपुरवठा होऊन अनेकांना निवारा मिळाला. अकोल्यातील सर्वप्रथम व गृहनिर्मितीत अग्रेसर असलेल्या आदर्श सहकारी वसाहत या आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या. अकोला जिल्हा मराठा मंडळ व राज्य सोशल व वेलफेअर बोर्डामार्फत त्यांनी महिला व बालकांच्या उन्नतीकरिता भरीव कार्य केले. 

शैक्षणिक कार्याचा त्यांना विशेष ओढा होता. श्री शिवाजी शिक्षण संस्था, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीव सदस्या होत्या. या संस्थांच्या माध्यमातून विदर्भात विद्यादानाचे कार्यात त्या सदैव क्रियाशिल राहिल्या आहेत. शेतकरी कुटूंबतील असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांविषयी नेहमीच आस्था राहिली आहे. भारत कृषक समाजाच्या आजीव सदस्य राहून त्यांनी शेतकरी सेवेचे व्रतही यशस्वीपणे पार पाडलं. अल्पबचत समिती व मुंबईच्या सोशल वेलफेअर बोर्डवर सदस्या, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी वेगळी छाप पाडली. अमेरिका, युरोप, जपान व हवाई बेटे या पाश्‍चात्य देशांना भेटी देऊन त्यांनी तेथील सहकारी चळवळ व सामाजिक संस्कृतीचे अध्ययन केले. 
मिळविलेले ज्ञान आपल्यापर्यंत मर्यादीत न ठेवता त्याचा देशातील चळवळीला, समाजाला लाभ व्हावा म्हणून त्यांनी "प्रदक्षिणा भूमातेची' हे पुस्तक प्रकाशीत केले. तसेच त्यांचे वडील श्रीधर सपकाळ यांच्यावरचे चारित्रात्मक "पिताश्री' हे पुस्तक देखील प्रकाशित केले. सामाजिक, राजकीय जीवनासोबतच कौटुंबिक जीवनात त्यांनी आदर्श पत्नी, आदर्श माता व आदर्श गृहिणी ही तत्वे यशस्वीपणे पूर्ण केलीत. 

सहकार महर्षी डॉ. अण्णासाहेब कोरपे यांच्या शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ जीवनात आदर्श धर्मपत्नीचे तत्व अंगीकारून त्या जनतेला प्रेरक ठरल्या आहेत. डॉ. कुसूमताई कोरपे यांच्या मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. संतोषदादा कोरपे, अमेरिका निवासी इंजीनिअर सतीषचंद्र, डॉ. सुभाषचंद्र, डॉ. कांचनमाला घोरपडे, डॉ. कल्पना महाडिक, डॉ. काननबाला येळीककर या मुली, सुना, डॉ. जयराज व डॉ. युवराज या नातवंडासह मोठा आप्त परिवार समाजसेवेचा त्यांचा वारसा पुढे नेत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com