kunbi mahamorcha | Sarkarnama

कुणबी समाजाच्या मोर्चातही नेत्यांना बंदी, गडचिरोलीत आरक्षणासाठी महामोर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

गडचिरोली : मराठा आरक्षणाचा फायदा विदर्भातील कुणबी समाजाला देण्यात यावा, या मागणीसाठी गडचिरोलीत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चातही मराठा मोर्चाप्रमाणे नेत्यांना बाजूला ठेवण्यात आले व युवकांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. 

गडचिरोली : मराठा आरक्षणाचा फायदा विदर्भातील कुणबी समाजाला देण्यात यावा, या मागणीसाठी गडचिरोलीत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चातही मराठा मोर्चाप्रमाणे नेत्यांना बाजूला ठेवण्यात आले व युवकांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. 

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. विदर्भात मराठा समाजाची संख्या कमी आहे. यामुळे विदर्भात मराठा आरक्षणाचा फायदा कुणबी समाजाला देण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. या संदर्भात कॉंग्रेसचे नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनीही मागणी करून या मागणीला पाठिंबा दिला आहे. या मागणीसाठी कुणबी समाजातर्फे गडचिरोलीत मोर्चा काढण्यात आला. नक्षलवादी कारवायांमुळे या जिल्ह्यात मोठे मोर्चे निघत नाही. परंतु कुणबी समाजाच्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 10 हजार कुणबी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. 

या मोर्चाचे नेतृत्व मात्र कोणत्याही नेत्याकडे नव्हते. या मोर्चाच्यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नाना पटोले मोर्चाच्या स्थळी आले होते. या मोर्चाच्या व्यासपीठावर मात्र त्यांना स्थान मिळाले नाही. कुणबी समाजाच्या तरुणांनी या मोर्चात कोणत्याही नेत्याकडे नेतृत्व राहणार नसल्याचे स्पष्ट केले. या मोर्चाला कॉंग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. यात आमदार बाळू धानोरकर, आमदार सुनील केदार, आमदार यशोमती ठाकूर आदींनी पाठिंबा दिला होता. परंतु यापैकी एकाही नेत्याला व्यासपीठावर स्थान मिळाले नाही. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात विदर्भात मराठा आरक्षणाचा फायदा कुणबी समाजाला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख