...तर नीलेश राणे विधानसभेच्या रिंगणात!

शिवसेनेसमोर मुख्य आव्हान राणेंचे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी आजही मजबूत आहे.
...तर नीलेश राणे विधानसभेच्या रिंगणात!

कुडाळ (सिंधुदुर्ग): शिवसेना विरूद्ध नारायण राणे, असा कडवा संघर्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कुडाळ-मालवण. राज्यात पाच वर्षे सत्तेत असूनही भाजप येथे फारशी ताकद निर्माण करू शकला नाही. राणे भाजपवासी झाले तर शिवसेनेसमोरचे आव्हान कडवे होणार आहे. अर्थात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यासमोर उमेदवार कोण असणार? यावर जय-पराजयाची गणिते ठरणार आहेत.

पूर्वीच्या वेंगुर्ले मतदारसंघातील कुडाळ आणि कणकवलीतील मालवण तालुका मिळून कुडाळ मतदारसंघ बनला आहे. पुर्वरचनेनंतरची यंदा होणारी तिसरी निवडणूक असेल. 2014 मध्ये येथील लढत आणि निकाल "हाय व्होल्टेज' ठरला. कारण या मतदारसंघाने माजी मुख्यमंत्री राणे यांना पराभव दाखवला. शिवसेनेचे वैभव नाईक निवडून आले. दुसऱ्या टर्मसाठी नाईक सज्ज झाले आहेत. शिस्तबद्ध मोर्चेबांधणी करणारा नेता, अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद असले तरी गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्याच मतदारसंघाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले होते. या आधीचे आमदार राणे यांचा विमानतळ, सी वर्ल्ड आदी मोठ्या प्रकल्पांवर भर असायचा. नाईक यांनी वाडी वस्त्यांवरील छोट्या-छोट्या कामांना प्राधान्य दिले. प्रत्येक गावात-वाडीत एक तरी काम होईल असा प्रयत्न केला. संवेदनशील विषय मुत्सद्दीपणे हाताळले. आताही चतुर्थी आधीच त्यांचा कार्य अहवाल, गणेशोत्सव भेट जवळपास प्रत्येक घरात पोहोचली आहे. यावरून त्यांनी किती भक्‍कम नेटवर्क निर्माण केले याचा अंदाज येतो.

येथे शिवसेनेसमोर मुख्य आव्हान राणेंचे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी आजही मजबूत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकद आहे. तुलनेत भाजपला मात्र फारशी ताकद निर्माण करता आली नाही. आताही राणे भाजपवासी झाले व युती तुटली तर येथे तुल्यबळ लढत अपेक्षीत आहे. अर्थात भाजपकडून उमेदवार कोण असेल? यावरही बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. राणे भाजपमध्ये असले तर इथल्या उमेदवार त्यांच्याच मर्जीतील असणार आहे. येथून स्वाभिमानतर्फे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत आणि स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत इच्छूक आहेत. या दोन्ही इच्छुकांची स्वतःची ताकद आहे. स्वतः राणे येथून उमेदवार असल्यास अंतर्गत नाराजीचा प्रश्‍न येणार नाही; मात्र तसे न झाल्यास उमेदवारी कोणाला द्यायची? हा प्रश्‍न आहे. सावंत आणि सामंत यांच्यापैकी कोणीही उमेदवार असला तरी दुसऱ्या इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. यातच राणे यांनी एका वृत्त वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत स्वतः दिल्लीत व नीतेश आणि नीलेश यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास येथून डॉ. नीलेश राणे हे उमेदवार असतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com