पक्षांची अदलाबदल केलेल्या डॉ. क्षीरसागर - धांडे यांच्यात चाय पे चर्चा - Kshirsagar & Dhande meet over a cup of tea | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षांची अदलाबदल केलेल्या डॉ. क्षीरसागर - धांडे यांच्यात चाय पे चर्चा

दत्ता देशमुख 
गुरुवार, 11 जुलै 2019

माजी आमदार सुनिल धांडे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले आहेत. तर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आहेत. या दोन्ही नेत्यांत गुरुवारी चाय पे चर्चेच्या निमित्ताने चांगलाच हास्यकल्लोळ रंगला.

बीड : एकाने शिवसेनेतून राष्ट्रवादीत तर एकाने राष्ट्रवादीतून शिवसेनेत अशी पक्षांची  अदलाबदल  केलेल्या माजी आमदार सुनिल धांडे व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात शुक्रवारी चाय पे चर्चा आणि चांगलाच हास्यकल्लोळ रंगला. नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर सध्या शिवसेनेत तर माजी आमदार धांडे राष्ट्रवादीत आहेत.

क्षीरसागर घराणे सुरुवातीपासून काँग्रेसी विचारसणीचे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची राजकीय सुरुवातही युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदापासून झाली. त्यानंतर त्यांना फादर बॉडीतही प्रमोशन मिळाले. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा विक्रम करणारे डॉ. भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचेही जिल्हाध्यक्ष होते.

 दरम्यान, मागच्या खेपेला ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरच थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडुन आले. परंतु, भाऊबंदकीत पक्षाच्या नेत्यांकडून पुतण्याला बळ दिले जाऊ लागल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावरुन काढून मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले आहे. 

तर, प्राध्यापक असलेल्या सुनिल धांडे यांचा पिंड शिवसैनिकाचा. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहीलेले सुनिल धांडे याच पक्षाकडून बीड मतदार संघातून आमदार झाले. पुढे त्यांची राजकीय गाडी घसरगुंडीला लागली आणि त्यांनी थेट शिवदरा गाठला. त्यानंतर मनसेत प्रवेश केलेल्या धांडेंना ‘राज’कारण जमले नाही.

 दोन वेळा विधानसभेला पराभवानंतर धांडे यांनी मधल्या काळात पुन्हा शिवबंधन हाती बांधले आणि पक्षाने त्यांच्या खांद्यावर जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदाची धुरा सोपविली. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मनगटावरचे शिवबंधन काढून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. अशा प्रकारे या दोन्ही नेत्यांनी पक्षाची एकाचवेळी आदलाबदल केली आहे. 

दरम्यान, सर्वपक्षीयांशी ‘संबंध आणि सलोखा’ हा डॉ. क्षीरसागर यांचा ‘प्लस पॉईंट मानला जातो. तर, मनमुराद हसण्यात धांडेंनाही तोड नाही. योगायोगाने शुक्रवारी हे दोन नेते एकत्र आले. चाय पे चर्चेच्या निमित्ताने मग या दोघांत चांगलाच हास्यकल्लोळ रंगला.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख