kshirsagar and love | Sarkarnama

हनिमून महिन्यानंतर, गृहप्रवेश सहा महिन्यांनी, संघर्षात फुलली डॉ. दीपा व भारतभूषण यांची प्रेमकहाणी

दत्ता देशमुख
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

व्हॅलेंटाईन डे स्पेशल 

बीड : बीडचे नगराध्यक्ष असलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे डॉ. दीपा क्षीरसागर यांच्यावर प्रेम जडले. पण, त्यांना प्रेम व्यक्त करायला, दोन्ही कुटूंबाकडून होकार मिळवायला, प्रेमाचे लग्नात रुपांतर करायला आणि लग्नानंतर गृहप्रवेश करण्यासाठी संघर्षही तेवढाच करावा लागला. पण, डॉ. दीपा व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी "तेरे बिना जिना नही' च्या आणाभाका घेतलेल्या असल्याने त्यांनी हार मानली नाही. नियतीलाही हेच मान्य होते म्हणून ही प्रेमवेल फुलली आणि दोन मुले - नातवंडे अशी फळलीही. पण, या प्रेमकहाणीचे वेगळेपण म्हणजे प्रेमाला चार वर्षांनी यश, हनिमून लग्नानंतर महिन्याने आणि गृहप्रवेश तीन महिन्यांनी असे आहे. 

केशरबाई क्षीरसागर या जिल्ह्यातल्या मातब्बर राजकारणी, राजकारणात जेवढा त्यांचा दबदबा तेवढाच कुटूंबातही त्या शिस्तीच्या आणि कडक स्वभावाच्या. पती सोनाजीराव क्षीरसागरही तेवढेच शिस्तीचे आणि कडक स्वभावाचेच. दरम्यान, केशरबाई क्षीरसागर पंचायत समितीच्या सभापती असल्याने त्या शासकीय निवासस्थानात राहत. त्यावेळी त्यांचे चिरंजीव डॉ. भारतभूषण क्षीरसागर दहावीला शिकत होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण - इर्लेकर बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी होते. त्यांच्या पत्नी डॉ. सुहासिनी इर्लेकर या नामांकित साहित्यीक आणि बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक. या दाम्पत्याची कन्या डॉ. दीपा सातवी-आठवीला होत्या. गटविकास अधिकारी असल्याने त्यांनाही शासकीय निवासस्थान. या दोघांचेही घर शेजारी असल्याने खेळण्याच्या निमित्ताने दोघांचा सहवास वाढला. त्यातूनच डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या मनात डॉ. दीपा यांच्या विषयी प्रेमभावना निर्माण झाली. त्यावेळी प्रेम व्यक्त करण्याची संदेशयंत्रणा म्हणजे फक्त पत्र. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रेमपत्र लिहले आणि किराणा दुकानात सामान भरण्यासाठी आलेल्या डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या पिशवीत टाकले. आता होकार का नकार याचा सस्पेंन्स असला तरी उत्तराची आयडियाही भन्नाटच होती. होकार असेल तर डॉ. दीपा यांनी घराच्या कुंपणाला पांढऱ्या रंगाचा कपडा बांधायचा आणि नकार असेल तर लाल रंगाचा. होकार यावा यासाठी भारतभूषण देव पाण्यात घालून बसले होते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते पण कुठलेच निशाण फडकत नव्हते. अखेरीस आठ तासांनी सायंकाळच्या सुमारास "होकाराचा सिग्नल' मिळाला आणि जग जिंकल्याचा आनंद डॉ. भारतभूषण यांच्या मनाला झाला. पण, या लव्हस्टोरीतील खरे वळण येथूनच मिळाले. नजरभेटीसाठी भारतभूषण डॉ. दीपा शिकत असलेल्या कन्याशाळेला घिरट्या मारत. दोघांची संदेशयंत्रणाही तेवढीच पक्की होती. किराणा दुकानातून सामान भरण्याच्या वेळा ठरलेल्या असत. मग, किराणाच्या पुड्यांबरोबरच एकमेकांची प्रेमपत्रे एकमेकांच्या पिशवीत पडत. सायकलीवर शाळेत जाऊन शाळा सुटून बाहेर पडलेल्या डॉ. दीपा यांना भारतभूषण क्षीरसागर - गळ्यातले, कानातले, बांगड्या गिफ्ट देत. पण, हे प्रेम फुलत असतानाच यशवंतराव इर्लेकर यांची उस्मानाबादला बदली झाली. त्यामुळे दीपाही तिकडे गेल्या. मग, डॉ. भारतभूषण यांच्या उस्मानाबाद वाऱ्या सुरु झाल्या. त्यावेळी क्षीरसागर कुटूंबात दुचाकी नसल्याने कामाचे निमित्त सांगून त्यांनी मित्राकडून दुचाकी घ्यायची आणि थेट उस्मानाबाद गाठायचे. हा सर्व खटाटोप करून फक्त नजर भेट आणि फारच नशिब असेल तर पाच मिनीटे थेट संवाद. असे साधारण तीन -चार वर्षे झाल्यानंतर पुन्हा यशवंतराव चव्हाण - इर्लेकरांची बीडला बदली झाली. पण, या लव्हस्टोरीत नवे वळण आले. कारण, त्यावेळी डॉ. दीपा क्षीरसागर यांचे लग्न जमून पत्रिकाही वाटप करणे सुरु होते. 
"साथ जियेंगे - साथ मरेंगे'च्या आणाभाका आणि... 
डॉ. दीपा यांनी आई - वडिलांना प्रेमाबद्दल कल्पना दिली. पण, त्यांचे लग्न जमविले. पत्रिका छापून वाटप करणे सुरु होते. दोघे भेटले आणि लग्न जमलेल्या नवरदेवाला दोघांनीही स्वतंत्रपणे भेटून "आमचे प्रेम' असल्याची कल्पना दिली. त्यानेही मान्य केले पण घरच्यांना हे लग्न करायचेच होते. "मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही, झालेच तर जिवाचे बरे वाईट करु ' या मतावर दोघेही ठाम होते. इकडे क्षीरसागर कुटूंबियांनाही या प्रेमाची कल्पना आली होती. मग, यावर तोडगा म्हणून डॉ. दीपा यांचे लग्न होईपर्यंत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना बाहेर न्यायचे ठरले. त्यावेळी केशरबाई क्षीरसागर रोजगार हमी योजना समितीच्या राज्याच्या अध्यक्षा होत्या. राज्यभरातल्या विविध ठिकाणच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी भारतभूषण यांना सोबत घेतले. लग्न तिथी जवळ येत होती तशी या दोघांची तगमग शिगेला पोचली होती. पुढे काय, असे प्रश्न होते. लग्न झालेच तर डॉ. दीपा क्षीरसागर जिवाचे काही बरेवाईट करतील या चिंतेने डॉ. भारतभूषण क्षीरसागर अस्वस्थ होते. लग्न तीन दिवसांवर असताना त्यांनी आई केशरबाई यांना परीक्षेचा बहाणा सांगत बीडला जाणे गरजेचे असल्याचे सांगून मुंबईहून बीड गाठले. 

मित्रांच्या साथीने दोघांनी गाठले कोल्हापूर 
लग्न तीन दिवसांवर आलेले होते. डॉ. दीपा यांची पदवी प्रथम वर्षाची परीक्षा सुरु होती. पण, आई - वडिल घराबाहेर पडू देत नव्हते. मात्र, त्यांची मैत्रिण निता बाली यांनी घरच्यांना विश्वास देऊन परीक्षेच्या कारणाने घराबाहेर काढले. इकडे सरदार नावाच्या फिटरने त्यांना वाहन द्यायची तयारी दाखविली. डॉ. दीपा यांचा पेपर संपताच दोघांनी कोल्हापूर गाठले. तिथे प्रकाश पाटील नावाच्या मित्राने त्यांची रहायची सोय केली. पण, इकडे लग्न मोडल्याने हल्लकल्लोळ माजला होता. विधानसभेची निवडणूक होती आणि विरोधकांनी केशरबाई क्षीरसागर यांना याच मुद्द्याने घेरले होते. दरम्यान, प्रकाश पाटील हे क्षीरसागर कुटूंबियांचे कौटुंबिक स्नेही असलेल्या बप्पासाहेब पवार यांचे नातेवाईक असल्याने डॉ. दीपा व भारतभूषण कोल्हापूरला असल्याची कल्पना आली. केशरबाई क्षीरसागर व व जयदत्त क्षीरसागर यांनी बप्पासाहेबांना या शोधमोहिमेवर पाठविले. प्रकाश पाटील यांनी डॉ. दिपा व डॉ. भारतभूषण क्षीरसागर या दोघांना कपडे खरेदीसाठी पैसे दिले होते. बाजारात दोघे कपडे खरेदी करत असताना त्यांना बप्पासाहेब दिसले आणि डॉ. भारतभूषण यांना चांगलेच हायसे वाटले. कारण, बप्पासाहेब त्यांना शोधत आलेत याची कल्पनाच त्यांना नव्हती. केशरबाई क्षीरसागर आजारी असल्याचे सांगून या दोघांना परत आणले. काकू मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात ऍडमिट होत्या. तिथे भेटीला गेल्यानंतर काकूंनीही या सर्व बाबीला नकार दिला. पण, भारतभूषण यांचे मन मानायला तयार नव्हते. 
तर, मी ड्रायव्हिंग करेल वा मिलीट्रीत जाईल मग दिले लग्न लावून 
डॉ. दीपा यांचे लग्न मोडल्यानंतर डॉ. दीपा व भारतभूषण क्षीरसागर यांच्या लग्नाची स्टोरीही तेवढीच गंमतीची आणि रंजक आहे. डॉ. दीपा यांचे लग्न मोडल्यानंतर यशवंतराव इर्लेकरांनी उस्मानाबादला बदली करुन घेतली. पण, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी हार मानली नाही. ते मित्राची दुचाकी घेऊन जातच. अशातच एकदा बाहेरचा मुलगा आपल्या गावच्या मुलीला भेटायला येतोय म्हणून उस्मानाबादच्या तरुणांनी त्यांना गाठले. पण, ते सहीसलमामत सुटले. त्यांनी सुहासिनी व यशवंतराव इर्लेकरांना त्यांची मुलगी डॉ. दीपा यांच्यासोबत लग्नासाठी गळ घातली. "तुझ्या घरच्यांचा विरोध आहे. तुला घराबाहेर काढले तर काय करशील, कसे जगशील ' या प्रश्नावर मला "ड्रायव्हिंग येते, मी ड्रायव्हर होईल किंवा सैन्यात जाईल' असे उत्तर देऊन भारतभूषण क्षीरसागर यांनी त्यांना विश्‍वास दिला. विशेष म्हणजे भारतभूषण क्षीरसागर यांनी दोन वेळा सैन्य भरतीचा प्रयत्नही केला. फिजिकली फिट असलेल्या डॉ. भारतभूषण यांना डोळ्यामुळे अनफिट व्हावे लागले. 

महिन्याने हनीमून आणि सहा महिन्यांनी गृहप्रवेश 
डॉ. दीपा यांचे नातेवाईक राजी झाल्यानंतर त्यांचे बार्शीचे आतेमामा जगदाळे यांच्या मदतीने या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहानंतर डॉ. दीपा उस्मानाबादला आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर बीडला आले. महिनाभराने मित्रांच्या मदतीने पैशांची जुळवाजुळव करुन त्यांनी हैद्राबादला जाऊन हनीमून केला. पण, या लग्नाचा क्षीरसागर कुटुंबियांना थांगपत्ताही नव्हता. डॉ. भारतभूषण, मित्र डी. डी. कुलकर्णी, वट्टमवार, चिटवकर यांच्याकडे राहत असत. प्रत्येकाकडे आठ - दहा दिवस मुक्काम असा शेड्युलच होता. पण, सर्व गोष्टी आईच्या सांगाव्यात अशी तगमग त्यांच्या मनी होती. पण, समोर जाण्याची हिंमत नसल्याने त्यांनी केशरबाई क्षीरसागर यांना सर्व हकीकत पत्रातून सांगीतली. नंतर त्यांचीही मानसिकता हळुहळू बदली होती आणि मग मुलाचा निर्णय स्वीकारुन केशरबाई क्षीरसागर यांनी डॉ. दीपा व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा गृहप्रवेश करुन घेतला. लग्नानंतर वडिल सोनाजीराव, भारतभूषण यांच्याशी सहा महिने बोलत नव्हते. पण, सुनबाईंचे त्यांना भारी कौतुक होते. आज राजकीय क्षेत्रात डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची स्वतंत्र ओळख आणि अस्तीत्व असून डॉ. दीपा क्षीरसागर देखील राजकारण, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटून आहेत. त्यांना डॉ. योगेश हा मुलगा व एक मुलगी आणि नातवंडे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख