भाजपचा डाव उधळण्यासाठीच गट फोडला होता - कृष्णा पाटील डोणगांवकर

स्थानिक नेत्यांनी देखील ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, म्हणून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सत्तार साहेबांच्या मदतीने आम्हीच भाजपचा गट फोडला, हे सगळेकाही पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून केले असा दावा माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी सरकारनामाशी बोलतांना केला.
 भाजपचा डाव उधळण्यासाठीच गट फोडला होता - कृष्णा पाटील डोणगांवकर

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचा एक मोठा गट फोडून त्यांच्या मदतीने भाजप हे पद बळकावू पाहत होता. गेल्या महिनाभरापासून तशी तयारी सुरू होती, त्याची चाहूल लागताच मी स्थानिक नेत्यांसह मुंबईतील नेत्यांच्या देखील कानावर ही बाब घातली होती. परंतु राज्यमंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या घाईगडबडीत नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 

स्थानिक नेत्यांनी देखील ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही, म्हणून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सत्तार साहेबांच्या मदतीने आम्हीच भाजपचा गट फोडला, हे सगळेकाही पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून केले असा दावा माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगांवकर यांनी बंडखोरी केली होती. राज्यमंत्री सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंड ईश्‍वर चिठ्ठीमुळे अयशस्वी ठरले. पण या बंडाची मोठी किमंत देवयानी डोणगांवकर त्यांचे पती कृष्णा पाटील यांना मोजावी लागली. पक्षाने या दोघांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर कृष्णा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण हे पाऊल का उचलले याचा उलगडा केला. 

डोणगांवकर म्हणाले, सत्तार विरोधक कॉंग्रेस सदस्य श्रीराम महाजन हे काही सदस्यांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मला मिळाली होती. भाजप सदस्यांच्या पाठिंबा मिळवत बांधकाम सभापती पदाच्या बदल्यात भाजपचा अध्यक्ष करण्याची त्यांची तयारी होती. यासाठी भाजपकडून महाजन यांना मोठी रदस देखील पुरवण्यात आली होती. हा सगळा प्रकार आपण मुंबईसह स्थानिक नेत्यांच्याही निदर्शनास आणून दिला. पण त्यावर गांभीर्याने विचार झाला नाही. 

अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असतांना पक्षाकडून कुठलाच निर्णय होत नसल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कल्पना दिली. ज्या महाजनांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला, त्यांना पद कसे द्यायचे ? असा प्रश्‍न त्यांनी वरिष्ठ नेत्यांनाही विचारला. कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपद भाजपकडे आणि बांधकाम सभापती पद श्रीराम महाजन यांच्याकडे जाऊ नये, आणि शिवसेनेचाच अध्यक्ष व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही पावले टाकली. माझ्या पत्नीला अध्यक्षपद मिळावे म्हणून आम्ही हे केले नाही असे स्पष्टीकरण देखील डोणगांवकर यांनी केले. पक्षाने पत्नी आणि माझ्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली आहे. यावर मी बोलणार नाही, तो नेत्यांचा अधिकार आहे. पण माझी भूमिका पक्षप्रमुखांकडे आपण स्पष्ट केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com