Krupashankar singh campaigns for Aditya Thakare | Sarkarnama

कृपाशंकर सिंग आदित्य ठाकरेंच्या प्रचारात 

समीर सुर्वे 
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

कृपाशंकर सिंग भाजपमध्ये आहेत कि शिवसेनेत आहेत, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. 

मुंबई:  कॉंग्रेसचे एकेकाळचे उत्तर भारतीय नेतृत्व मुंबईचा विधानसभा निवडणूकीच्या मैदानात दिसत नसल्याने ते नक्की कोठे गेले अशी चर्चा सुरू होती. मात्र कृपाशंकर सिंग दोन दिवसांपूर्वी एका प्रचारात दिसले.

तो ना कॉंग्रेसच्या उमेदवाराचा होता ना भाजपच्या उमेदवाराचा तो थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी वरळीत पोहोचले होते. या आश्‍चर्यकारक घडामोडींमुळे कृपाशंकर सिंग भाजपमध्ये आहेत कि शिवसेनेत आहेत, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. 

वरळीत रविवारी उत्तर भारतीयांची वरळी हिल इस्टेट या परिसरात शिवसेनेने मिटींग घेतली होती. या मिटींगला कृपा शंकर सिंग उपस्थित असल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष चेंबूरकरही या वेळी हजर होते. सुनील शिंदे यांनी भाषणाला हिंदीत सुरुवात केली. आणि आपल्याला हिंदी चांगले येत नाही पण आजुबाजूला हिंदी भाषिक आहेत असे त्यांनी नमूद केले.

यावर कृपाशंकर यांनी "तुम्ही मराठीत बोला' आम्ही समजून घेऊ असे सांगितले. मात्र तरीही सुनील शिंदे यांनी हिंदीतच भाषण केले. कृपाशंकर गृहराज्यमंत्री असताना त्यांच्या केबिनमध्ये कॉंग्रेसपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची गर्दी असायची असे सांगत शिवसेना आणि सिंग यांच्या ऋणानुबंध फार जुने असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 

कृपाशंकर सिंग हे कॉंग्रेसचे माजी आमदार म्हणून राज्यमंत्री होते तसेच ते मुंबई कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्षही होते. त्यांच्यावरती आर्थिक घोटाळ्याचा आरोप झाला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने त्यांना या घोटाळ्यात निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर अचानक एक दिड महिन्यापूर्वी कृपाशंकर सिंग पुन्हा चर्चेत आले. विधानसभेसाठी कॉंग्रेसच्या इच्छूकांच्या मुलाखती सुरू असताना कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेले. भेट झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर येत आपण कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याचे पत्रकारां समोर जाहिर केले. 

 

काश्‍मिरमधील स्वायत्ता रद्द करण्याबाबत कॉंग्रेसने घेतलेली भूमिका न पटल्याने आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण पुढे काही घडलेच नाही. मुंबईतील उत्तर भारतीयांचा चेहरा असलेले या निवडणूकीच्या मैदानात कोठेच दिसत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिंग यांचे सलोख्याचे संबंध होते. पण ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत नव्हते. दिसले ते थेट आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख