शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने भाजपच्या संपर्कात : युती न झाल्यास मोर्चेबांधणी

शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने भाजपच्या संपर्कात : युती न झाल्यास मोर्चेबांधणी

मुंबई : लोकसभेचा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकार मंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

याशिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील "इलेक्‍टीव मेरिट' असलेल्या वजनदार नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. युती न झाल्यास निवडणुकीच्या तोंडावर कृपाल तुमाने आणि कुंपणावरच्या अन्य खासदारांच्या हातात कमळ देण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. 

लोकसभेच्या निवडणुका घोषित होण्यास जेमतेम तीन आठवडे शिल्लक आहेत. निवडणूक जवळ आली तरी युतीबाबत काहीही हालचाली होताना दिसत नाही. शिवसेनेच्या मनात नेमके काय आहे याचा थांगपत्ता लागत नसल्याने भाजपने स्वबळाची तयारी ठेवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर लढण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे लोकसभेच्या मैदानात जनतेला परिचित असलेला चेहरे देण्यावर भाजपचा भर आहे. 

16 ते 18 ठिकाणी नवे उमेदवार 

भाजपला स्वबळावर लढावे लागल्यास विद्यमान खासदारांच्या जागा वगळता 16 ते 18 ठिकाणी नवे उमेदवार द्यावे लागतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांना मुंबई दक्षिणमध्य आणि महादेव जानकर यांना बारामतीची जागा सोडून उर्वरित जागांवर प्रभावी उमेदवार देण्याचे भाजपने ठरवले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com