krishnaraj mahadik | Sarkarnama

कोल्हापुरच्या खासदारांचा मुलगा "लाल मातीत' रमला नाही; बनला "कार रेस' विजेता!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

संसदेतही झाला गौरव 
आमदार, खासदार, मंत्री यांची मुले काय करतात, हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या लोकप्रतिनिधींची मुले राजकारणात यावीत असा एक पायंडा आहे आणि तेच सद्या सुरू आहे. पण त्याला छेद देत कृष्णराज याने वेगळी वाट चोखाळली आणि त्यात विजेतेपदही पटकावले. त्याच्या या कार्याचा गौरव संसदेतही झाला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्याचा अभिनंदनाचा ठराव मांडल्यानंतर उपस्थित खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 
 

कोल्हापूर : आजोबा, चुलत आजोबा, चुलते, वडील अशी घराण्यात पैलवानकीची मोठी परंपरा...आपल्याही मुलांनी पैलवान व्हावे ही वडीलांची इच्छा... म्हणून ते आम्हा तिन्हीही भावडांना लहानपणापासूनच रोज पहाटे तालमीत घेऊन जात, पण माझे काय मन त्या लाल मातीत रमले नाही... वडीलांची इच्छा मी पैलवान व्हावे अशी, पण मी झालो जगातील सर्वात वेगवान कार रेसिंगचा चालक...अशा शब्दात इंग्लडमधील आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये 19 वर्षानंतर भारताला विजेतेपद मिळवून दिलेल्या कृष्णराज धनंजय महाडीक याने आपला प्रवास सांगितला. 

कृष्णराज हा येथील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांचा लहान मुलगा. इंग्लड येथे 6 ऑगष्ट रोजी झालेल्या फॉर्म्युला 3 कार रेसिंगमध्ये कृष्णराजने विजेतेपद पटकावले. यापुर्वी 1998 साली कार्तिकेयन याने हा बहुमान पटकावला होता. तब्बल 19 वर्षांनी भारताचे व कोल्हापुरचे नाव स्पर्धेतील चषकावर कोरण्याचे काम कृष्णराजने केले. आज त्याने "सकाळ' च्या कोल्हापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तो बोलत होता. 

माजी किरकोळ देहयष्टी, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी यामुळे वडीलांनी मला पैलवान करण्याचा नाद सोडून दिला आणि आम्हा तिन्हीही भावांना त्यांनी करियर निवडण्याची संधी दिली. त्यावेळी मी कार रेसिंगचा पर्याय निवडला. या निर्णयाला वडीलांनी मनापासून पाठिंबा तर दिलाच पण बळही दिले. या खेळ तसा फारच खर्चिक आहे. भारतात सरावासाठी केवळ दोनच मैदान आहेत. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला चमकायचे असेल तर त्यासाठी परदेशातच चांगली सोय आहे. पण वडीलांनी संपूर्ण अर्थिक ताकद माझ्यामागे उभी केली. सचिन मंडोडी हे माझे प्रशिक्षक त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले. आई सौ. अरूंधती, भाऊ पृथ्वीराज,विश्‍वराज यांचे पाठबळ या जोरावर मी हे यश मिळवू शकलो असेही कृष्णराज याने यावेळी सांगितले. 

तो म्हणाला,"हा खेळ म्हणजे ताशी 230-250 किलोमीटर वेगाने कार चालवण्याच थरार असतो. वाटेत वेडीवाकडी वळणे, ताशी 170 च्या वेगाने या वळणावर नियंत्रण मिळवणे आणि पुन्हा ध्येय गाठण्यासाठी वेग धरणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी शारीरीक तंदुरूस्तीपेक्षा मानसिकत स्थिती फार महत्त्वाची असते. सकाळी जीम, दुपारी हलका आहार, नंतर स्क्रिनवर गाड्यांचा सराव आणि सायंकाळी प्रत्यक्ष मैदानावर सरावर हा रोजचा कार्यक्रम होता. मानसिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त असाल तरच वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या या कारचे सारथ्य शक्‍य आहे. त्यासाठी आहारवर नियंत्रण महत्त्वाचे होते. मला गोड फार आवडत होते पण इच्छित ध्येय साध्य करायचे तर काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो, त्यासाठी खाण्या पिण्याच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून मी ध्येयापर्यंत पोहचलो.' 

माझे शिक्षण विवेकानंद महाविद्यालयात सुरू आहे. माझे इतर दोन भाऊही शिक्षण व खेळाच्या निमित्ताने परदेशातच असतात. वडील खासदार असल्याने ते दिल्लीत. त्यामुळे आम्ही पाच जण एकत्र असे फारसे भेटतच नाही. त्यामुळे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी आम्ही कुटुंबियांसोबत रहातो. तेच मला फार आवडते, असेही कृष्णराजने सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख