कुछ किए बिना ही जयजयकार नही होती : कृष्ण प्रकाश 

मी यूपीएससी करणार म्हटल्यानंतर अनेकांकडून 'हा काय करणार' अशी हेटाळणीही झाली; पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एक गोष्ट मात्र अगदी ठरवून केली ती म्हणजे दररोज डायरी लिहायचो. वर्षाच्या सुरवातीलाच त्या डायरीची सुरवातीची पाच-सहा पाने कोरीच ठेवायचो आणि या पानांवर ज्यांनी ज्यांनी हेटाळणी केली, त्यांची ती वाक्‍ये लिहून ठेवायचो.
Krishna Prakash
Krishna Prakash

कोल्हापूर : स्वत:तील टॅलेंटला स्वत:च जाणून घ्या... जे काही ध्येय साध्य करायचे आहे, त्यासाठी 'ऍक्‍शन प्लॅन' तयार करा आणि तो प्रत्यक्षात उतरण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागा. कारण 'कुछ किए बिना ही जयजयकार नही होती... कोशिश करने वालों की कभी हार नही होती...' विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सिक्‍युरिटी) कृष्ण प्रकाश संवाद साधत होते आणि अधिकारी बनून देशाची इमानेइतबारे सेवा करण्याची आस मनात बाळगून कार्यरत असलेल्या तरुणाईच्या स्वप्नांना नवे पंख लाभत होते. 

निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठ आयोजित डीवायपी ग्रुप प्रस्तुत 'ऊर्जा : संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमाचे. कार्यक्रमातील अखेरचे पुष्प आज कृष्ण प्रकाश यांनी गुंफले. तब्बल दीड तासांच्या संवादातून त्यांनी स्वत्वाच्या शोधापासून ते ऍक्‍शन प्लॅन कसा असावा, तो कसा राबवावा आणि यशस्वी झाल्यानंतरही माणूसपण कसे जपले पाहिजे, या विषयीच्या मौलिक टिप्स दिल्या. 

भगवद्‌गीता, कुराणांपासून आणि शिवछत्रपतीपासून ते नेपोलियन जगभरातील विविध तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचे विविध दाखले देत कृष्ण प्रकाश यांनी संवाद साधला. संस्कृत वचने, विविध शेर आणि कवितांसह बोधकथांचा सुरेख मिलाफ साधत त्यांनी साधलेला हा संवाद सर्वांनाच भावला. शिवाजी विद्यापीठाचे लोककला केंद्र हा संवाद ऐकण्यासाठी तुडुंब भरून गेले आणि त्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने सकारात्मक ऊर्जेचा झराच येथे अवतरला.

कृष्ण प्रकाश म्हणाले, ''जो काहीच मनापासून ठरवत नाही, त्याला कधीच काही करता येणार नाही. जे मनापासून करावेसे वाटते, ते पहिल्यांदा ठरवा. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ते स्वप्न सत्यात उतरताना प्रत्यक्ष कृतिशील कार्यक्रमही आखा. कारण ही सारी प्रक्रिया यशाकडे घेऊन जाताना महत्त्वाची असते. मी यूपीएससी करणार म्हटल्यानंतर अनेकांकडून 'हा काय करणार' अशी हेटाळणीही झाली; पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एक गोष्ट मात्र अगदी ठरवून केली ती म्हणजे दररोज डायरी लिहायचो. वर्षाच्या सुरवातीलाच त्या डायरीची सुरवातीची पाच-सहा पाने कोरीच ठेवायचो आणि या पानांवर ज्यांनी ज्यांनी हेटाळणी केली, त्यांची ती वाक्‍ये लिहून ठेवायचो. रात्री आठ ते सकाळी दहा अभ्यास करायचो आणि त्याची सुरवातच ही पाच-सहा पाने वाचून करायचो.'' 

तुम्हाला जे काही करायचे आहे, त्याचा मास्टर प्लॅन तयार करा. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक आठवड्याचा, महिन्याचा आणि एकूणच वर्षाचा असा हा प्लॅन असायला हवा. जगभरात केवळ तीन टक्केच माणसे आहेत, की जी रोजचा स्वत:चा प्लॅन लिहून काढतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. त्यामुळे एकदा ती सवयही लावून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटका करण्याची योजना आखून फक्त बसून राहिले असते तर काहीच झाले नसते. त्यांनी योजना आखली आणि त्यासाठीचा कृती आराखडा तयार करून तो अमलात आणल्यानेच ते आग्र्याहून सहीसलामत बाहेर पडू शकले. शिवचरित्रातील असे अनेक प्रसंग जाणीवपूर्वक अभ्यासा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' असाच संदेश दिला. पण आपण नेमके उलटे करतो. शिका आणि संघटित व्हा हे दोन्ही टप्पे सोडून देतो आणि थेट संघर्षाकडे वळतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com