Koregaon Bhima will be under watch by 11 drones | Sarkarnama

कोरेगाव - भीमावर असेल ११ ड्रोनची आकाशातून नजर ;विजयस्तंभ शासनाच्या ताब्यात 

सरकारनामा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला.

मुंबई :  कोरेगाव - भीमावर येता १ जानेवारी रोजी  ११ ड्रोनची आकाशातून नजर असणार आहे . गेल्या वेळेसच्या तुलनेत पंधरा पट जादा पोलीस बंदोबस्त तेथे असणार असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे . दरम्यान ,विजयस्तंभाचा ताबा राज्य  शासनाकडे ११ जानेवारीपर्यंत सोपविण्यात आला आहे . 

कोरेगाव - भीमा येथे येणाऱ्या नागरिकांसाठी 300 पाण्याचे टॅंकर, 150 पीएमपीच्या बस, 11 ठिकाणी पार्किंग व्यवस्था प्रशासनाने केली आहे . 

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. या ठिकाणी 30 डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली होती.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दर वर्षी 30 डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होतात. विजयस्तंभाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये; तसेच कार्यक्रम सुरळीत व्हावा म्हणून नियोजन करण्यासाठी राज्य सरकारला या जागेचा ताबा हवा आहे, असा अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केला होता.

कार्यक्रम झाल्यानंतर जागा पुन्हा पूर्ववत करून देण्याची हमी त्यांनी राज्य सरकारच्या वतीने दिली. गेल्या वर्षी या काळात कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, म्हणून राज्य सरकारने या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या जागेचा ताबा 12 जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे सोपवण्यास न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने मान्यता दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख