रत्नागिरी जिल्हा - युती वा आघाडी झाली तरी मारुन मुटकूनच

कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांपेक्षा भावनिक आवाहन आणि मुद्द्यांच्या परिघातच रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण चालते. अशा पद्धतीत माहीर शिवसेनेच्या स्थानाला धक्का लावणे इतर पक्षांना फारसे जमलेले नाही. गेल्या पाच वर्षांत भाजपने शिवसेनेला जेरीस आणण्याचा राज्यपातळीवर प्रयत्न केला. त्याची री जिल्ह्यात ओढली गेली. त्यातून भाजपचा संख्यात्मक फायदा झाला असला, तरी शिवसेनेविरोधात निवडणूक जिंकण्याची ताकद अजून तरी भाजपकडे नाही. कॉंग्रेसचे बळच संपले आहे, तर राष्ट्रवादी खूपच मर्यादित.
Uday Samant - Vinay Natu - Ajit Yashwantrao - Shekhar Nikam
Uday Samant - Vinay Natu - Ajit Yashwantrao - Shekhar Nikam

नाणार आणि जैतापूर प्रकल्पाचा विरोध हा शिवसेनेसाठी कळीचा मुद्दा राहिला. भाजपनेही याला साथ दिल्यामुळे भावनिक आवाहनावरच दोघांची भिस्त राहिली आहे. कॉंग्रेस जिल्ह्यात संपत चालली आहे. राष्ट्रवादीचा जोर केडर बेसपेक्षा शेखर निकम आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्यांभोवती असलेल्या प्रभावळीपुरताच मर्यादित आहे. त्यामानाने कानामागून येऊनही स्वाभिमानने तिखट झाल्याची चुणूक लोकसभा निवडणुकीत दाखवली. या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मात्र, लोकसभेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात युतीला मिळालेली आघाडी लक्षात घेता युतीच्या उमेदवारांना पराभूत करण्याची क्षमता इतर पक्षांत नाही. त्यामुळे युती मोडली तरच इतरांना संधी, असे अत्यंत ढोबळ; परंतु स्पष्ट चित्र आहे. जिल्ह्यामध्ये युती तसेच आघाडी कागदावर. मात्र, शिवसेना-भाजप युती आणि आघाडी मारून-मुटकूनच असणार आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे नेमके वर्णन या एका ओळीत करता येईल. 

लोकसभा निवडणुकीपासून राजकारण काही तापलेले नाही. युतीबाबत संदिग्धता आहे. भाजपचे नेते स्वबळावर लढण्यास तयार असले, तरी वरिष्ठ पातळीवरून युती करायला लावून त्यांचा अवसानघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्या साडेचार वर्षांत शक्‍य होईल तेथे शिवसेनेला नडायचे, या पद्धतीने भाजपची वाटचाल असताना नाणार प्रश्‍नावर श्रेष्ठींनी कच खाल्ली आणि युतीही झाली. विनायक राऊत यांना विरोध करूनही श्रेष्ठींनी गप्प बसण्यास लावले. या पार्श्‍वभूमीवर युती झालीच, तर निमूटपणे गुहागर मतदारसंघावर भाजपला समाधान मानावे लागेल. तेथे डॉ. विनय नातू यांनाच उमेदवारी मिळेल. मनापासून युती करायची नसली, तरी पर्याय नाही. 

हीच अवस्था कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आहे. आघाडीविना त्यांची ताकद अगदीच नगण्य आहे. इच्छुकांच्या अपेक्षा म्हणजे फक्त उत्साह आहे.  लोकसभा निवडणूक निकालामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी पिछाडीवर आहे, त्याचा पडताळाही दिसला आहे. स्वाभिमानच्या अपेक्षांचा फुगा फुटलाच. त्यामुळे युतीला टक्कर देणे सोपे नाही, असा एक गंड इतर राजकीय पक्षांमध्ये तयार झालाय. ज्यांनी लढाई करायची त्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचाच पायात पाय घालण्याचा खेळ सुरू आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नेते यांची तोंडे दोन दिशेला. राष्ट्रवादीचे निकम जिवाचे रान करीत असताना भास्कर जाधवांना चिपळूणमधून उमेदवारी हवी आहे. 

दापोली मतदारसंघातून संजय कदम पुन्हा रिंगणात असतील. अजित यशवंतराव यांना कॉंग्रेसचा विरोध आहे. या पद्धतीच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल अधिकाधिक खच्चीच होत आहे. रत्नागिरीतून उदय सामंत, राजापूरमधून राजन साळवी, चिपळूणमधून सदानंद चव्हाण यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित मानली जाते. साळवी यांच्या विरोधात राजापुरात स्थानिक मुद्दा असला, तरी शिवसेनेत आदेश आल्यावर बंडोबा थंड होतील. रायगड मतदारसंघाला जोडलेले गुहागर आणि खेड-दापोली मतदारसंघ चर्चेत राहणार आहेत. दापोलीत शिवसेनेअंतर्गत कुरबुरी मोठ्या आहेत. त्यामुळे त्याबद्दलचा अंदाज बांधणे कठीण आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत गदारोळ झालाच, तर शिवसेनेला कठीण जाऊ शकते. गुहागरमधून भास्कर जाधव किती जोमाने लढणार, यावर राष्ट्रवादीचे बळ जोखता येईल. 

पांढरपेशांचा सहभाग मोठा 
'नाणार हवा' असा नारा देत एक चळवळ सुरू झाली आहे. त्यामध्ये पांढरपेशांचा सहभाग मोठा आहे. यामुळे जिल्ह्यातून सकारात्मक संदेश गेला असला, तरी निवडणुकीसाठी तो पुरेसा नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com