कोकणात कॉंग्रेसची पीछेहाट तर राष्ट्रवादीला बाळसे

काँग्रेसची पीछेहाटका ?* विद्यार्थी संघटना संपुष्टात* सेवादलचे कार्यकर्ते कालबाह्य* युवा नेतृत्वाचा अभाव* सक्षम कार्यकर्त्यांची गरज
Congress_NCP
Congress_NCP

कणकवली :  समाजवाद्यांच्या कोकणातील बालेकिल्ल्यात एकेकाळी मुसंडी मारलेल्या कॉंग्रेसला आता आपली उरलीसुरली किंमतही राखणे अवघड बनले आहे.

लोकसभेनंतर विधानसभेत कोकणातील कॉंग्रेसच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ल्याने शक्‍तीहीन झालेली कॉंग्रेस पाहून या पक्षाला मानणारे कार्यकर्तेही हतबल झाले आहेत. पूर्ण कोकण पट्टयात सक्षम नेतृत्व नसल्याने या भागात पक्षाचे भविष्यही अडचणीत आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीची परिस्थिती फारच खालावली होती. महाराष्ट्राच्या निकालामुळे कॉंग्रेसला मोठे हादरे बसले होते. अगदी 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर कॉंग्रेसचे पुढे काय होणार? असा प्रश्‍न विचारला जात होता; पण नुकत्याच झालेल्या विधानसभेने कॉंग्रेसला उभारी दिली.

आघाडी करून घटक पक्षांनी निवडणुका लढल्याने कॉंग्रेसला महाराष्ट्राच्या विधानसभेत समाधानकारक जागा मिळवता आल्या; पण कोकणात कॉंग्रेसचा पाय या निवडणुकीत आणखी खोलात गेला आहे.

कोकणात सुरवातीला समाजवादी पक्षाचा पगडा होता. त्यावेळपासून कोकणातील गावागावांत कॉंग्रेस पक्ष पोहोचला होता. अनेक नेते कोकणातून निर्माण झाले होते. बॅ. के. आर. अंतुले हे कोकणचे नेते राज्याच्या मुख्यमंत्रिपदीही विराजमान झाले.

पूर्ण कोकणात कॉंग्रेस पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर दीर्घकाळ राहिले. मधल्या काळात शिवसेनेचा प्रभाव वाढल्यामुळे कॉंग्रेस बॅकफूटला गेली होती, तरीही त्यांची मते बऱ्यापैकी होती. 2005 रोजी नारायण राणे यांनी कॉंग्रेस प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये कॉंग्रेसला काही प्रमाणात बळ आले. राणेंनी कॉंग्रेस सोडली आणि या पक्षाला लागलेली उतरती कळा आता आणखी वेगाने सुरू आहे.


या विधानसभेत पूर्ण कोकणात केवळ राजापूरमध्ये पक्षाने चांगली लढत दिली. येथे अविनाश लाड हे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. कणकवली आणि कुडाळमध्ये अवघे तीन हजार मते उमेदवारांना मिळाली. रायगडमध्ये एकही कॉंग्रेसचा उमेदवार नव्हता. एकूण विधानसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसची कोकणातली परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. सक्षम नेतृत्व नसल्याने ही अवस्था आहे.


कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना कोकणात जवळपास नेस्तनाबूत झाली. इतकेच काय तर कॉंग्रेसच्या विविध जाती-धर्मांचे सेल, सेवादल या प्रभावी संघटना मातीमोल झाल्याने नवीन नेतृत्व तयार झाले नाही. सातत्याने बाहेरून आलेल्या नेत्यांना कॉंग्रेसने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कॉंग्रेस म्हणून मानणारा जो घटक होता, तो हळूहळू कमी होऊ लागल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले आहे.


कॉंग्रेसची एकीकडे वाताहत झाली असली तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा बाळसे धरले आहे. या खेपेस विधानसभेवर "शेकाप'शी हातमिळवणी करून राष्ट्रवादीने उरण, श्रीवर्धन तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणची जागा मिळवली. त्यामुळे "एनसीपी'ने पुन्हा एकदा बाळसे धरले; पण कॉंग्रेसच्या पदरात काय पडले, "शेकाप'ला तरी रायगडमध्ये जागा पुन्हा मिळवता आल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com